दिनांक १७ जुलै,श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथे घरफोडी करणाऱ्या तिन सराईत आरोपींना अटक करीत त्यांचेकडुन ५ गुन्हे उघडकीस आणुन चोरीच्या ३ मोटरसायकल, २ एल.ई.डी टीव्ही, १ होम थिएटर व चांदीच्या वस्तु असा एकुन सुमारे १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस पथकाच्या या कारवाई विषयी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांना सांगितले.
दिनांक १४ जुलै २० रोजी शिक्षक कॉलनी श्रीगोंदा येथे फिर्यादीच्या बंद घराचा पाठीमागील दरवाजा उचकाटुन घरातील चांदीचे दागिने घरफोडी करुन चोरुन नेल्याची घटना घडली होती. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भा.द.वि.कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चालु होता.
दरम्यान दिनांक १६ जुलै २० रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सपोनि सानप, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ संजय काळे, पोकॉ गोकुळ इंगवले यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार पो. नि. दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कोबिंग ऑपरेशन राबवुन आरोपी रमेश आमद्या चव्हाण (वय ६० वर्षे), दत्ता रमेश चव्हाण (वय ३५ वर्षे) दोघे रा.जलालपुर ता.कर्जत, गणेश मंगेश काळे (वय २० वर्षे) रा.कुळधरण ता.कर्जत यांना अटक करुन पुढील चोरीचे गुन्हे उघडकीस करून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.
दाखल गुन्ह्यांप्रमाणे नमुद आरोपिंकडुन हिरो HF डीलक्स कंपनीची मो.सा.क्र. MH १६ CR ४१८४ किंमत ३० हजार, हिरो स्प्लेंडर कंपनीची मो.सा.क्र. MH १२ RV ४८८५ किंमत ३५ हजार, हिरो स्प्लेंडर कंपनीची मो.सा.क्र . MIL १६ BF ३२८७ किंमत ३५ हजार, एक मेलबॉन कंपनीची एल.ई.डी..३२ इंची टी.व्ही किंमत १५,५००, एक एल.ई.डी ३२ इंची टी. व्ही. किंमत १५,५००, एक होम थिएटर एफ अँण्ड डी कंपनीची किंमत १० हजार, चांदीचे दोन करंडे किंमत २.५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत आरोपींनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यातील ३ मोटार सायकल २ एल. ई. डी. टीव्ही, १ होम थिएटर व चांदीचे दोन करंडे असा सुमारे १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत आरोपींना दिनांक १६ जुलै रोजी अटक करण्यात आली असून, आरोपींकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता स्थानिक प्रशासन वर्तवित आहे.
सदरची कारवाई (पोलीस अधिक्षक) अखिलेश कुमार सिंह, (अप्पर पोलीस अधिक्षक) सागर पाटील,(उपविभागीय पोलीस अधिकारी) संजय सातव, (पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र सानप, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोका प्रकाश मांडगे, पोकॉ संजय काळे, पोकॉ गोकुळ इंगवले, पोकॉ योगेश सुपेकर, पोकॉ किरण भापकर, पोकॉ नय्युम पठाण, पोकॉ प्रशांत राठोड मोबाईल सेल अहमदनगर यांनी केली आहे.
(स्रोत: उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत यांनी दिलेली माहिती)
