श्रीगोंद्यात अवैध माती वाहतूक करणारे ३ हायवा जप्त; महसूल पथकावर धावून जात चालक फरार, ६० लाखांचा मुद्देमाल..

दिनांक २७ मे २०२६,श्रीगोंदा:

हिंगणी दुमाला आणि निंबवी शिवार परिसरात बेकायदेशीर माती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या टोळीवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईत एकूण ६० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शासकीय कामात अडथळा आणून महसूल पथकाला धमकावणारे तीन चालक वाहने सोडून फरार झाले आहेत. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणी दुमाला व निंबवी परिसरात अवैध माती व मुरुम उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार सचिन डोंगरे यांना मिळाली होती.

त्यानुसार तहसीलदार डोंगरे, अपर तहसीलदार विनीत शिर्के, ग्राममहसूल अधिकारी आकाश ढोरमले व महसूल कर्मचाऱ्यांच्या दोन पथकांनी बुधवारी (दि. २७) दुपारी या परिसरात सापळा रचला.

दुपारी दोनच्या सुमारास हिंगणी ते गव्हाणवाडी रस्त्यावर महसूल पथकाने विना क्रमांकाचा एक अशोक लेलंड हायवा आणि भारत बेंज कंपनीचा हायवा (क्र. MH-16-DP-8099) थांबवला.

दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी १० हजार रुपये किमतीची ५ ब्रास पोयटा माती आढळून आली. पथकाने चालकांकडे परवान्याची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना मिळून आला नाही.

विना क्रमांकाच्या हायवा चालकाने आपले नाव नितीन राऊत (रा. सोनवडी, ता. दौंड) असे सांगितले, तर दुसऱ्या चालकाने नाव सांगण्यास नकार दिला. तहसीलदार डोंगरे यांनी दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात नेण्याचे आदेश दिले असता, चालकांनी पथकाशी उद्धट वर्तन करत अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला आणि वाहने जागेवरच सोडून पळ काढला.

दुसऱ्या कारवाईत, निंबवी शिवारात अप्पर तहसीलदार विनीत शिर्के यांच्या पथकाने बेलवंडी पोलिसांच्या मदतीने हायवा ट्रक (क्र. MH-16-AY-4894) पकडला. याही वाहनात परवान्याशिवाय ५ ब्रास पोयटा माती वाहतूक केली जात होती.

चालक किरण गावडे यानेही शासकीय कामात अडथळा आणत पोलिसांसोबत येण्यास नकार दिला व वाहन सोडून पळ काढला.

महसूल पथकाने दोन्ही ठिकाणांहून प्रत्येकी २० लाख रुपये किमतीचे ३ हायवा ट्रक आणि एकूण ३० हजार रुपयांची १५ ब्रास पोयटा माती, असा एकूण ६० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवणे, पर्यावरणाचा ऱ्हास करणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांवर धावून जात कामात अडथळा आणल्याप्रकरणी चालक नितीन राऊत, किरण गावडे आणि एका अनोळखी चालकाविरुद्ध ग्राममहसूल अधिकारी आकाश ढोरमले यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत.

स्रोत:(फिर्याद)

प्रतिकात्मक फोटो वापरण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading