श्रीगोंद्यात दोन ठिकाणी घरफोडी,साडेतीन लाखांसह १७ हजार रुपये चोरी..
दिनांक १९ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे.काल दोन ठिकाणी शहराच्या मध्यावर घरफोड्या झाल्या आहेत.साडेतीन लाख रुपये तर एका ठिकाणी १७ हजार रुपये चोरांनी चोरून नेले.
वृत्तपत्र विक्रेते दत्तात्रय शिंदे यांच्या वाड्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा तोळे सोनं,पन्नास हजारांची रोख रक्कम असे एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शिंदे यांचे १८ तारखेला पहाटे निधन झाले.अंत्यसंस्कार चालू असताना,त्यांच्या भाजी मंडई येथील वाड्याचे कुलूप तोडून,चोरट्यांनी कपाटातील रक्कम व ऐवज चोरला.अनिल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव व (उप निरीक्षक)राजेंद्र सानप यांनी श्वानपथक बोलावीत तपास केला.तसेच,चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
याशिवाय,कुंभार गल्लीत राहणाऱ्या धारकर सर यांच्या घरीही चोरी झाली असून, तेथून दहा हजार रुपये रोख रक्कम व सात हजार रुपये किमतीचे चांदीचे ५ नग चोरीला गेले आहेत.गेल्या दहा दिवसांपासून मुलीकडे राहायला गेलेल्या धारकर यांना शेजारील विमल शिरीष खाडे यांनी फोन करून चोरी झाल्याचे सांगितले.यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.