पिसाळलेल्या श्वानाच्या हल्ल्यात,एक दिवसाच्या बालकाचा मृत्यू..पेडगाव येथील घटना..

दिनांक २० ऑक्टोबर,(पेडगाव) श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे लाकडाचा कोळसा बनवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी समाजाच्या,महिलेचा एक दिवसाचा जन्मलेला मुलगा झोपडीत त्याच्या आई शेजारी असताना,पिसाळलेल्या श्वानाने आईवर हल्ला करीत लचके तोडण्यास सुरुवात केली.तिला गंभीररीत्या जखमी केल्यानंतर काही तासांपूर्वी जन्मलेल्या मुलावर हल्ला करीत त्याला खाण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
ही घटना काल दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पेडगाव येथील भवानी माता रोड परिसरात घडली.मौजे कर्जत,तालुका,मावळ,जिल्हा पुणे येथील मूळचे रहिवाशी असलेले,गुलाब पप्पू कोली गेल्या एक दीड महिन्या पासून कुटुंबासह पेडगाव येथे कोळसा बनवण्याचे काम करीत आहेत. कोली यांची पत्नी काल सकाळी दहा वाजता प्रसूत झाल्यानंतर जन्माला आलेल्या मुलावर अशा पद्धतीने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला.यात त्याचा जीव गेला आहे.
गुलाब कोली यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आई या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिच्या हातावर व पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत.तिला उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे.
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात बहुतेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या चपेट मध्ये लहान-वृद्ध येत असून,शेळ्या मेंढ्या सह पाळीव जनावरे यांचा शिकार होत आहेत. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत,नगरपालिकेच्या प्रशासनाने यावर योग्य ते उपाय योजना करणे नमूद घटनेवरून गरजेचे झाले आहे.
(छायाचित्र व वार्तांकन;शफिक हवालदार)

Leave a Reply