श्रीगोंदा तालुक्यातील विविध नदीकाठच्या गावांमध्ये अनधिकृत गौण खनिज उत्खनन होत असल्याचे समोर येत आहे.यापैकी,वांगदरी शेजारील डोमाळेवाडीत नदीकाठच्या खाजगी क्षेत्रात,अनधिकृत गौण खनिज उत्खनन होत असल्याची तक्रार,जागा मालक पारुबाई किसन मदने यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन सह तहसीलदार श्रीगोंदा यांच्याकडे दिली आहे.दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या या तक्रारीनंतर,पोलीस सह तहसील प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे समजते आहे.
पारूबाई मदने या डोमाळेवाडी तील रहिवासी असून,त्यांच्या गट क्रमांक ७५ मध्ये अर्धा एकर क्षेत्रात, अर्जुन किसन मदने व भाऊ किसन मदने हे इसम अनाधिकारशाहीने नमूद जमिनीमध्ये स्थानिक प्रशासनाची तमा न बाळगता,खुलेआम गौण खनिज उत्खनन करीत आहेत. उलट,जागा मालक मदने यांना शिवीगाळ करीत धमकावत आहेत.याविषयी दिनांक १८ ऑक्टोबर रोजी मदने यांनी श्रीगोंदा तहसील व पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला आहे.
यावर स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. या पद्धतीने मालकी हक्कात दडपशाही करत, अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणे,बेकायदेशीर असून,यावर जिल्ह्याचे(पोलीस अधीक्षक)इशू सिंधू यांनी विशेष प्रतिबंधात्मक योजना राबविल्याचे सर्वश्रुत आहे.तरीही,दडपशाही ने लोकांच्या नदीकाठच्या जमिनीमधून वाळू,मुरूम,माती उत्खनन चालू असल्याचे नमूद उदाहरणावरून स्पष्ट होत आहे.
श्रीगोंद्याचे पोलीस व महसूल प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे. संबंधीत बीट अंमलदार यांना याविषयी माहिती विचारली असता. दरम्यान कालखंडात निवडणूक प्रक्रिया चालू असल्या ने,कारवाई करता आली नसल्याचे ते सांगत आहेत.
गुन्हा घडत असल्याचे पीडित पोलीस प्रशासनाला सांगत असतानाही,कारवाई होत नसल्याने.स्थानिक पोलीस आणि वाळूमाफियांचे काही हितसंबंध तर नाहीत ना ? असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे. कारवाई न केल्यास श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचेही पीडितांनी माध्यमांना सांगितले आहे.