दिनांक १५ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत अटक आरोपीकडून १,५५,०००/- रुपयांच्या किमतीच्या ४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे ४ गुन्हे उघडकीस आले असून चोरीच्या मालमत्तेचा एकूण आकडा आता ११,५५,०००/- रुपयांवर पोहोचला आहे.

दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता, श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील काष्टी बीट परिसरात पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना, श्रीगोंदा चौकात एका व्यक्तीची संशयास्पद हालचाल आढळली. सदर व्यक्ती महेंद्र बाळू सुपेकर (वय २८ वर्षे, राहणार पुनर्वसन काष्टी, ता. श्रीगोंदा) असे त्याचे नाव असून, त्याच्या ताब्यातील मोटारसायकलवर कोणतीही नंबरप्लेट नसल्यामुळे त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणले.

प्राथमिक चौकशीत आरोपीकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने, अधिक तपास करण्यात आला. याआधीच आरोपीकडून चोरीच्या १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या. परंतु, पुढील चौकशीत गोपनीय माहितीनुसार आणखी ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

सदर जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
१. होंडा सीबी शाईन: चेसिस नंबर – ME4JC654GHT06982 (अर्धवट खोडलेला), इंजिन नंबर – JC65ET1114394
२. हिरो स्प्लेंडर: चेसिस नंबर – MBLHA10ASCHM40510, इंजिन नंबर – HA10ECLCHM1670
३. हिरो एचएफ डिलक्स: चेसिस नंबर – MBLHA11EK99L036, इंजिन नंबर – HA11EB99L2575
४. टीव्हीएस स्टार सीटी: चेसिस नंबर – MD625KFS461C51398 (इंजिन नंबर खोडलेला)

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. विवेकानंद वाखारे, तसेच पोलीस निरीक्षक श्री. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोलीस हवालदार गोकुळ इंगवले, संदीप शिरसाठ, अरुण पवार आणि कोर्ट ऑर्डली रुपाली मोटे यांचा समावेश होता.

आतापर्यंत एकूण १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त केलेल्या मोटारसायकलींच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. मोटारसायकलींच्या मालकांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
