तरुणाच्या अपहरण प्रकरणात पुणे पोलिसांची धडक कारवाई: सहा आरोपी गजाआड, श्रीगोंद्याच्या तरुणाचा सहभाग उघड..

दिनांक १४ जानेवारी २०२५, पुणे:

आर्थिक वादातून झालेल्या अपहरणप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सहा आरोपींना अटक करून तामिळनाडूतील तरुणाची सुखरूप सुटका केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मुंबई, श्रीगोंदा आणि पुणे येथील व्यक्तींचा समावेश आहे.

मोहमद फर्मान मेहेरबान (२७), अर्जुनकुमार शिवकुमार (२८), (दोघे रा. नरुलापूर, बिजनौर, उत्तर प्रदेश), देवेंद्र सुनील अलभर (२५, रा. दैवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), अंकित अर्जुन अडागळे (२५, रा. पवई, मुंबई), प्रियांक देवेंद्र राणा (३३, रा. आदर्शनगर, हरिद्वार, उत्तराखंड), अविनाश दत्तात्रय कदम (४३, रा. शिक्रापूर फाटा, ता. शिरूर, जि. पुणे).. यातील आरोपींची नावे आहेत.

जाहिरात..

मूळ तामिळनाडूतील असलेल्या पीडित तरुणाचे आरोपींशी आर्थिक व्यवहारांवरून वाद झाले होते. नोकरीचे आमिष दाखवून आरोपींनी त्याला मुंबईला बोलावले. त्यानंतर कंपनीच्या परिसरातून त्याचे अपहरण करण्यात आले. सोलापूर रस्त्यावरील एका लॉजमध्ये त्याला डांबून ठेवले आणि कुटुंबीयांना धमकावत तीन लाख रुपयांची खंडणी मागितली.

पीडित कुटुंबीयांनी खंडणीची रक्कम पाठविल्यानंतरही आरोपींनी तरुणाला सोडले नाही. त्याच्यावर मारहाण करून अजून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक तपास करून सोलापूर रस्त्यावरील लॉजमधून आरोपींना ताब्यात घेतले आणि तरुणाची सुटका केली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.

पोलिसांच्या जलद आणि परिणामकारक तपासामुळे पीडित तरुणाला सुखरूपपणे वाचवणे शक्य झाले. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading