डॉक्टर नवीन यादव यांचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू: श्रीगोंदा शहर हादरलं..

दिनांक १५ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर नवीन यादव यांचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयासमोरील एका इमारतीत ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. यादव हे तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांना डोक्याला गंभीर जखम झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची नोंद श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल फलके करत आहेत. घटनेची नेमकी कारणे शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.

जाहिरात..

डॉ. नवीन यादव हे नॅशनल रुरल हेल्थ मिशन अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने तालुक्यात वैद्यकीय सेवा देत होते. त्यांची आरोग्य सेवा क्षेत्रातील कार्यक्षमता आणि समर्पण यामुळे तालुक्यातील लोकांमध्ये त्यांचा चांगला लौकिक होता.

या घटनेने संपूर्ण श्रीगोंदा शहर हादरले असून, डॉ. यादव यांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रासह सामान्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या अशा आकस्मिक निधनाने श्रीगोंदा शहरात शोककळा पसरली आहे. पुढील तपासाद्वारे या घटनेमागील सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्रोत:(आकस्मित मृत्यु नोंद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading