वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पदवी नसताना,भानगाव येथे दवाखाना थाटणारा गोपाळ बिस्वास( रा.पश्चिम बंगाल) या मुन्नाभाईला श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई संक्रांतीच्या दिवशी सकाळी दहा वाजता करण्यात आली आहे.
भानगाव येथे गोपाळ बिस्वास हा बोगस डॉक्टर आहे. तो मेडीकल क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर उपचार करीत आहे. यामध्ये रुग्णांचा बळी जाऊ शकतो.अशी तक्रार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचेकडे केली होती.
दौलतराव जाधव यांनी या प्रकरणी तात्काळ दखल घेतली आणि पोलिस उपनिरीक्षक सतिश गावीत यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सतीश गावीत यांनी गोपाळ बिस्वास याला बुधवारी सकाळी अटक केली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
डॉ.नितीन खामकर म्हणाले,खेड्या गावामध्ये एखादा बोगस डॉक्टर असेल किंवा सोनोग्राफी मशीन द्वारे लिंग तपासणी करत असेल तर तक्रार करावी आरोग्य विभाग त्याची दखल घेईल.