डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायकची आजही गरज का आहे?
व्हायरल न्यूज:
“जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले. तर, हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे. असे निःसंशय दिसेल”, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’च्या पहिल्या अंकात लिहिलेल्या लेखामधलं आरंभिक वाक्य आहे. हे आंबेडकरांचं पहिलंच पत्रकारी स्वरूपाचं लेखन असावं.
शंभर वर्षांपूर्वी, ३१ जानेवारी १९२० रोजी हा अंक प्रकाशित झाला. तेव्हापासून कितीतरी गोष्टी बदलल्या आहेत, पण तरीही म्हणावा इतका बदल झालेला नाही.
आंबेडकरांचं माध्यमांशी असलेलं नातं व्यामिश्र होतं. त्यांनी स्वतः वर्तमानपत्रं सुरू केली, चालवली, संपादित केली आणि सल्लागार म्हणूनही काम केलं. इतर वेळी माध्यमांमध्ये त्यांच्याविषयीचं वार्तांकन होत राहिलं. पोहोच आणि जवळपास एकहाती चालवलेल्या सामाजिक चळवळी यांचा विचार केला, तर आंबेडकर हे त्या काळी सर्वाधिक प्रवास केलेले राजकीय नेते असावेत.
सामाजिक पाठिंबा आणि आर्थिक पाठबळ यांच्या अभावी आंबेडकरांची चळवळ ही गरीब लोकांची चळवळ होती. काँग्रेस पक्षासारखी त्यांची स्थिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या समर्थकवर्गातील लोक कूळ वा वेठबिगार म्हणून काम करणारे वंचित होते. आर्थिकदृष्ट्या हा वर्ग सर्वांत कमी संसाधनं बाळगून होता.तर,बाहेरून फारसा पाठिंबा नसताना आंबेडकरांना हा सर्व भार स्वतःच्या खांद्यावर पेलावा लागला.माध्यमांच्या दृष्टीने हे दखलपात्र होतं.