मुंबई-लातूर- बिदर एक्सप्रेसमध्ये मोठा राडा झाला असून,१२ जणांनी केलेल्या मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सागर जनार्धन मारकड (२६) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
यामुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’एएनआय’ने याबाबत माहिती दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार,सागर हा बायको,लहान मुलगी आणि आईसोबत नातेवाईकाचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी उपळाई येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते.पुणे रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म नंबर ६ वरून मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेस गाडीच्या इंजिनचे जनरल डब्यातून पुणे ते कुर्डवाडी असे प्रवासाला निघाले असता,बसण्यास जागा नसल्याने सागर आणि त्याच्या सर्व कुटूंब उभे होते.
गाडी पुणे रेल्वे स्टेशनपासून सुटताच पती सागर यांनी दरवाजा लगत असलेल्या सीटवरील एका महिलेस म्हणाले की,माझ्या पत्नीजवळ लहान मुलगी आहे. बसण्यासाठी थोडी जागा द्या.तेव्हा त्या महिलेने पती सागर यांना शिवीगाळ केली.तेव्हा सागर यांनी त्या महिलेस शिवीगाळ करू नका,असे म्हटले.यावेळी तिथे असलेल्या सहा महिलांनी आणि त्यांच्यासोबतच्या सहा पुरुषांनी सागरला लाथाबुक्क्या आणि लाठीने बेदम मारहाण केली.सागरची पत्नी आणि आईने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.मात्र आरोपींना सागरला मारहाण सुरुच ठेवली आणि याच मारहाणी मध्ये त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून,आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी पुणे लोहमार्ग पोलीस यांच्याकडे वर्ग केला आहे.