चिमुकल्यांच्या दातृत्वातून उभी राहिली १५ टन धान्याची बँक! स्व. अजित पवार यांना ‘अग्नीपंख’ची अनोखी श्रद्धांजली..

दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:

राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘अग्नीपंख फाउंडेशन’ने ‘एक मूठ धान्य अनाथांसाठी’ हा स्तुत्य उपक्रम राबवला.

तालुक्यातील ६१ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तब्बल १५ मेट्रिक टन धान्याचा साठा जमा झाला असून, हे धान्य १७ विविध वसतिगृहांना वितरित करण्यात येणार आहे.

१० ते १६ फेब्रुवारी दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये हे धान्य संकलन करण्यात आले. या मोहिमेचा शुभारंभ माजी मंत्री बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार आणि तहसीलदार सचिन डोंगरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. बुधवारी देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेत खासदार निलेश लंके यांच्या हस्ते या उपक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, “स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रत्यर्थ अग्नीपंखने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सामाजिक जाणीव जपणाऱ्या या विद्यार्थ्यांचे दातृत्व पाहून मन भरून आले.”

जमा झालेल्या १५ टन धान्यातून शिरूर येथील ‘मनःशांती छात्रालयास’ १ टन धान्य देऊन वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. याशिवाय खालील संस्थांना मदत दिली जाणार आहे:

  • अहिल्यानगर: स्नेहालय, अनाम प्रेम, मानवसेवा प्रकल्प (अरणगाव).
  • श्रीगोंदा/कर्जत: महामानव बाबा आमटे संस्था, राहुल वसतिगृह, संकल्प (राशीन), स्नेहप्रेम (कर्जत).
  • इतर: अविश्री बालसदन (दौंड), दीपस्तंभ मनोबल (पुणे), छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग (सातारा).
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रा. संजय लाकूडझोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप घावटे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply