श्रीगोंदा, दि. ४ सप्टेंबर २०२५:
श्रीगोंदा शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या अखत्यारीतील शासकीय निवासस्थान व विश्रामगृह परिसरात अस्वच्छता, सोडा व बियरच्या बाटल्या तसेच अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शासकीय जागांचा गैरवापर तर केला जात नाही ना..? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंद्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या देखरेखीखालील शासकीय विश्रामगृह परिसरात रिकाम्या सोडा व बियरच्या बाटल्या विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्या आहेत. त्याचबरोबर या निवासस्थानाजवळील काही भागात बेकायदेशीर वृक्षतोडही झाल्याचे निदर्शनास आले आहे.

विशेष म्हणजे या प्रशासकीय निवासस्थानी एकूण तीन विश्रामगृह असून, येथे येणाऱ्या-जाणाऱ्यांची कोणतीही अधिकृत नोंद ठेवली जात नसल्याचे समोर आले आहे. कोणत्याही प्रकारचे रजिस्टर मेंटेन न करता अधिकारी व कर्मचारी प्रोटोकॉल न पाळता या ठिकाणी प्रवेश करीत असल्याचे दिसते. त्यामुळे येथे मध्यरात्री पार्ट्या तर घेतल्या जात नाहीत ना.? असा संशय व्यक्त केला जात आहे.

नमूद प्रकाराबाबत चौकशी केली असता, संबंधित उपअभियंता होके यांनी “सूचना करतो व सर्व ठीक करून घेतो” असे सरधोपट उत्तर दिले. त्यामुळे प्रत्यक्षात कारवाई होणार की नाही.? याबाबत शंका निर्माण झाली आहे.
स्रोत:(सद्य परस्थिती)
