दिनांक १३ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
तालुक्यातील आधोरेवाडी येथील शेतकरी किशोर आजिनाथ लाढाने यांची आयसीआयसीआय बँकेच्या श्रीगोंदा शाखेने पिळवणूक व फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या शेतकऱ्याचे थकीत पीक कर्ज परस्पर बँकेनेच नवे-जुने केल्यामुळे नमूद शेतकऱ्याला “महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने”चा लाभ घेता आला नाही. परिणामी त्यास या शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. याबाबत बँक अधिकाऱ्यांशी पीडिताने वारंवार संपर्क करून विचारणा केली. मात्र, बँक अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने त्यांची निराशा झाली आहे. परंतु, किशोर लाढाने यांनी आत्ता सविधानिक मार्गे न्याय मागायचे ठरवले असून, दिनांक १५ फेब्रुवारी वार सोमवार रोजी सकाळी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत या प्रकरणी दाद मागणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, किशोर लाढाने या शेतकऱ्याने आयसीआयसीआय बँकेच्या श्रीगोंदा शाखेमार्फत दिनांक ३० जून २०१६ रोजी घेतलेले पीक कर्ज बँकेने किशोर लाढणे यांना विचारात न घेता परस्पर नवे-जुने केले. यामुळे शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांना बँकेने केराची टोपली दाखवली आहे. लाढाने यांनी घेतलेले पीककर्ज परस्पर बँकेने नवे-जुने (रिस्टक्चर) केल्यामुळे शासनाने शेतकरी सबलीकरणासाठी तयार केलेली योजना फार्स ठरून नमूद शेतकऱ्याला लाभ घेता आला नाही. याबाबत बँकेशी पीडित लाढाने या शेतकऱ्याने वारंवार पत्रव्यवहार करीत, नमूद प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बँकेने निराश केले. यानंतर शासनाकडे केलेल्या पत्रव्यवहाराचा अनुषंगाने आयसीआयसीआय बँक श्रीगोंदा शाखेला विचारणा झाल्यानंतर त्यांनीही याबाबत रिजर्व बँकेचे अध्यादेश असल्याने असे केल्याचे उडवाउडवीची उत्तरं दिले आहे.
त्याचबरोबर सहाय्यक निबंधक श्रीगोंदा यांनीही नमूद प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पत्राद्वारे कळवले आहे की, आयसीआयसीआय बँकेने किशोर आजिनाथ लाढाने यांचे पीक कर्जाचे ३० सप्टेंबर २०१९ रोजी सभासदास विचारात न घेता, त्यांचे पीक कर्ज नवीन जुने केलेले आहे. शेतकरी/सभासदाच्या पीककर्ज नवे, जुने करताना संबंधित कर्जदाराची संमती घेणे आवश्यक असल्याचे. तसेच, या सर्व प्रक्रियेस बँक जबाबदार असल्याचे निदर्शनास येत असल्याबाबत नमूद केले आहे. या प्रकरणात पीक कर्जाचे रिस्टक्चर केले नसते. तर, संबंधित शेतकऱ्यास शासनाने जाहीर केलेल्या “महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजने”चा लाभ मिळाला असता. मात्र, त्यांचे कर्ज खाते दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकबाकी नसल्यामुळे त्यांना शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही. असे सहाय्यक निबंधक यांनी काढलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या श्रीगोंदा शाखेमार्फत किशोर आजिनाथ लाढाने या शेतकऱ्याच्या पीक कर्ज प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनी विना परवानगी केलेला हस्तक्षेप व शासनाच्या निर्देशास पायदळी तुडवल्यामुळे योजनेपासून वंचीत राहण्याची वेळ संबंधित शेतकऱ्यावर आल्याने, दिनांक १५ फेब्रुवारी २१ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर या प्रकरणी न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे पत्र, स्थानिक प्रशासनासह माध्यम प्रतिनिधींना किशोर लाढाणेनीं दिले आहे.
स्त्रोत:(किशोर लाढाने यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्र)
