दिनांक ६ ऑगस्ट २०२६ श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात शिवसेनेची पाळेमुळे रुजवून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ शिवसैनिक भाऊसाहेब गोरे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने श्रीगोंदा तालुक्यातील शिवसैनिकांसह विविध स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक हरिभाऊ काळे यांनी भाऊसाहेब गोरे यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, मुंबईत शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने भाऊसाहेब गोरे यांनी श्रीगोंदा तालुक्यात शिवसेनेचे रोपटे लावण्याचे काम सुरू केले. गावोगावी जाऊन शाखा स्थापन करत त्यांनी शिवसेना वाढवली आणि शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला.
हरिभाऊ काळे यांनी सांगितले की, भाऊसाहेब गोरे यांची ओळख केवळ तालुक्यापुरती मर्यादित नव्हती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळा नांदगावकर, मनोहर जोशी आणि नारायण राणे यांसारखे दिग्गज नेते त्यांना प्रेमाने “श्रीगोंद्याचे बाबा” म्हणून संबोधत असत.
त्यांनी एक आठवण सांगताना म्हटले की, “एकदा आम्ही भाऊसाहेबांसोबत मुंबईला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. कार्यक्रमस्थळापासून दूर उभे असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची गाडी तेथून जात होती. त्यांनी भाऊसाहेबांना पाहताच गाडी थांबवली आणि त्यांची आपुलकीने विचारपूस केली. त्यातून भाऊसाहेबांबद्दल वरिष्ठ नेत्यांच्या मनात असलेला सन्मान स्पष्ट होत होता.”
हरिभाऊ काळे यांनी पुढे म्हटले की, “भाऊसाहेब गोरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे परिवाराशी आणि शिवसेनेच्या विचारांशी एकनिष्ठ राहून कार्य केले. त्यांनी अनेक शिवसैनिकांना प्रेरणा दिली आणि निष्ठा, संघर्ष व जनसेवेचा आदर्श निर्माण केला. भाऊसाहेब, आपण नेहमीच आमच्या स्मरणात राहाल. आपणास अखेरचा जय महाराष्ट्र!”
स्रोत:(शिवसैनिक हरिभाऊ काळे)
