भिगवण/श्रीगोंदा, दि. ६ जुलै २०२५:
पंढरपूरहून देवदर्शन करून गावी परतणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव अज्ञात टँकरने जोरदार धडक दिल्याने एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. हा अपघात सकाळी १० वाजेच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घडला.

या अपघातात मल्हारी बाजीराव पवार (वय ५७, व्यवसाय – शेती, रा. येळपणे पोलीस वाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पंखाबाई मल्हारी पवार (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर भिगवणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पवार दांपत्य (एमएच १६ एजी २३४३ क्रमांकाची दुचाकी) घेऊन पंढरपूरहून दर्शन करून गावी परतत होते. दरम्यान, मागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात टँकरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेनंतर मल्हारी पवार हे रस्त्यावर दूर फेकले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी पंखाबाई या गंभीर जखमी झाल्या असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातानंतर टँकरचालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस सध्या त्या अज्ञात टँकर आणि चालकाचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेने येळपणे परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
