श्रीगोंदा, दि. ६ जुलै २०२५:
तालुक्यातील बांगर्डे ते खांडगाव रस्त्यावर टेकडी भागात लिंबू व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी अमोल सुरेश म्हेत्रे (वय २५, रा. शाडुचा मळा, मांडवगण रोड, श्रीगोंदा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलिसांनी १७ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

ही घटना दि. ५ जुलै रोजी सकाळी १०.२० च्या सुमारास घडली. फिर्यादी अमोल म्हेत्रे हे नेहमीप्रमाणे लिंबू खरेदीसाठी बांगर्डे भागातून जात असताना आरोपी सागर बोरुडे, दाद सातपुते (दोघेही रा. घोगरगाव, श्रीगोंदा) व त्यांच्या सोबत असलेल्या सुमारे १५ अनोळखी व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवले. “तू या गावात लिंबू खरेदी करू नकोस” असे म्हणत त्यांची गचांडी धरली व जबरदस्तीने गाडीतून खाली ओढून शेजारच्या शेतात नेले. तिथे फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.

या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या उजव्या हातातील दोन अंगठ्या आणि खिशातील १,९२,००० रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार आहे. तसेच, “पुन्हा या भागात दिसलास तर तुझे हातपाय तोडून टाकू” अशी धमकीही दिली गेली.

जखमी अमोल म्हेत्रे यांच्यावर श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस निरीक्षक किरण शिंदे, पोसई सचिन लिमकर, तपासी अधिकारी पोहेकॉ. नितीन गाडगे व सफौ. भगवान गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

या प्रकरणात भा.दं.सं.च्या (BNS) विविध गंभीर कलमांखाली – 119(1), 189(2), 191(2)(3), 126(2), 118(1), 115(2), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पंचनामा, डॉग स्कॉड किंवा फॉरेन्सिक तपास अद्याप न झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

या प्रकारामुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
