प्रेमभंग आणि नैराश्यातून श्रीगोंदा तालुक्यातील तरुणाची निमोणे येथे आत्महत्या.

दिनांक ५ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा/ निमोणे, ता. शिरूर:

प्रेमभंग आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून एका विवाहित तरुणाने शिरूर तालुक्यातील निमोणे गावात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मूळ श्रीगोंदा तालुक्यातील या तरुणाच्या पत्नीसह तीन मुलांवर मोठे संकट कोसळले आहे.

अनिल लक्ष्मण रोकडे (वय ३५, मूळ रा. कात्राबाद मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, सध्या रा. काळेवस्ती, निमोणे, ता. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो निमोणे येथील वीटभट्टीवर काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल रोकडे हा व्यसनाधीन होता आणि त्याला कुटुंबाने घराबाहेर काढले होते. त्यामुळे तो एका दूरच्या नातेवाइकाच्या कुटुंबासोबत आसरा घेऊन राहत होता. या कुटुंबातील विवाहित महिलेसोबत त्याची जवळीक वाढली आणि ते दोघे घर सोडून पळून गेले.

महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर निमोणे येथील वीटभट्टीवरून अनिल आणि त्या महिलेला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या समुपदेशनानंतर ती महिला तिच्या पती आणि मुलांसोबत परत जाण्यास तयार झाली.

मात्र, या निर्णयामुळे अनिलचा मोठा भ्रमनिरास झाला. प्रेमभंग आणि नैराश्यातून बुधवारी (दि. १) रात्री अनिलने वीटभट्टीवरील घरात ओढणीच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

अनिल रोकडे हा विवाहित असून त्याला पत्नी आणि तीन मुले आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे त्याचे कुटुंबही पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. या घटनेमुळे व्यसन आणि विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याच्या घटना पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.

अनिलच्या आत्महत्येप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विनोद मोरे अधिक तपास करत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading