दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ शिरूर/श्रीगोंदा:
शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे ट्रॅक्टर घोड नदीतील बंधाऱ्यावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शुभम राजू धायगुडे (वय १४, रा. हंगेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अ. नगर) असे मृत मुलाचे नाव आहे. ट्रॅक्टरचा चालक आणि शुभमचे चुलते भानुदास धायगुडे (४०) हे मात्र सुदैवाने बचावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ४) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चालक भानुदास धायगुडे ट्रॅक्टर घेऊन हंगेवाडीहून पिंपळसूटीकडे जात असताना, घोड नदीवरील अरुंद कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर नदीत कोसळला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चालक भानुदास पोहून बाहेर आले, मात्र शुभम ट्रॅक्टरच्या मड गार्डमध्ये अडकून नदीत बुडाला.

स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभागाच्या मदतीने धरणातून सोडले जाणारे पाणी थांबवून शोधकार्य सुरू करण्यात आले. तीन तासांनंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढला असता, त्यात अडकलेल्या शुभमचा मृतदेह आढळला.

या अरुंद बंधाऱ्यामुळेच अपघात झाल्याचे आणि अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुलाची मागणी प्रलंबित असल्याचे नागरिकांनी सांगितले. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
