दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ शिरूर/श्रीगोंदा:
शहरातील काही कॅफेमध्ये अवैधपणे पार्टिशन करून विद्यार्थ्यांना आडोसा मिळवून देण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी एका कॅफेवर छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणात द स्टीम रूम कॅफेचे चालक ऋषिकेश रामदास ढवळे (वय २३, रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील काही कॅफेमधून मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्याने इमारत मालक या कॅफेला जागा भाड्याने देत आहेत. त्यांना याबाबत माहिती असूनही ते याकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा गाळेमालकांवरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रवींद्र आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूरमधील काही कॅफेमध्ये शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी जागा तयार करून दिल्या जात होत्या. याठिकाणी असभ्य आणि अश्लील वर्तन होत असल्याच्या तक्रारी होत्या.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना याची माहिती मिळताच, पोलीस शिपाई शिंदे, हवालदार रवींद्र आव्हाड आणि महिला पोलीस शिपाई जाधव यांनी साध्या वेशात द स्टीम रूम कॅफेमध्ये प्रवेश केला. ग्राहक बनून नाश्ता ऑर्डर दिल्यानंतर काही वेळातच काही विद्यार्थी कपल्स कॅफेत आले आणि त्यांना चालकाने खासगी पार्टिशन असलेल्या जागेत नेले. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत विद्यार्थ्यांना आक्षेपार्ह स्थितीत आढळून घेतले.

यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश ढवळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साबळे करत आहेत. शहरातील इतर अशा कॅफेंवरही लवकरच कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
