दिनांक १४ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव रोडवरील सावंत नगर येथील रहिवाशांना गेल्या आठ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेची पाणीपुरवठा व्यवस्था अद्याप या वस्तीत पोहोचलेली नाही. त्यामुळे येथील सुमारे ५० कुटुंबे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, वारंवार मागणी करूनही नियमित टँकर मिळत नसल्याने येथील महिलांसह संपूर्ण रहिवाशांचे हाल सुरू आहेत. वाढत्या उन्हाळ्यात ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

याबाबत सावंत नगर रहिवाशांच्या वतीने तहसीलदार श्रीगोंदा यांना निवेदन देण्यात आले आहे. नगरपालिकेने या समस्येची तत्काळ दखल घेऊन एक दिवसाआड नियमित टँकरने पाणीपुरवठा करावा आणि वस्तीस अधिकृत नळ कनेक्शन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रहिवाशांनी १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत योग्य तो निर्णय न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

“आमच्या वस्तीतल्या अनेक महिला व लहान मुले कुपोषण आणि अस्वच्छतेमुळे त्रस्त आहेत. त्यांना जर वेळेत पिण्याचे पाणी मिळाले नाही आणि काही हानी झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.” असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर समाज बांधवांनी तहसील कार्यालयात निवेदन सादर केल्यानंतर नगरपरिषदेकडून आंदोलनकर्त्यांना पाणीपुरवठ्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र, या आश्वासनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. यानंतर सावंत नगर रहिवासी संजय सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा विचार करून पुढील आंदोलनाबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्याचे स्पष्ट केले आहे.
स्रोत:(निवेदन)

Advertise..
