घोड डावा कालव्यामधून तातडीने पाणी सोडावे; अन्यथा रस्ता रोकोचा इशारा..

दिनांक १४ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा (अहिल्यानगर):

घोड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी तातडीने पाणी सोडावे, अन्यथा सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता टाकळी कडेवळीत (श्रीगोंदा-राशिन मेन रोड) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस कामगार विभाग (शरदचंद्र पवार गट) श्रीगोंदा तालुकाध्यक्ष तुषार किसनराव नवले यांनी दिला आहे.

सध्या घोड डावा कालव्यामधून शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने गहू, हरभरा, कांदा, ऊस, मका, तसेच जनावरांसाठी लागणारा चारा सुकण्याच्या मार्गावर आहे. या भागातील ७५% शेतकरी घोड धरणाच्या पाण्यावर अवलंबून असून, जर त्वरित पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके जळून जातील.

यासंदर्भात कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२ श्रीगोंदा येथील कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत घोड डावा कालव्यामधून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० वाजता टाकळी कडेवळीत बस स्थानकासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, आमदार विक्रमसिंह पाचपुते, तहसीलदार श्रीगोंदा क्षितिजा वाघमारे, आणि पोलिस निरीक्षक श्रीगोंदा किरण शिंदे यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे.

पाण्याअभावी पिके करपण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading