१३ फेब्रुवारी २०२५ श्रीगोंदा (अहिल्यानगर):
महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या विरोधात गोवंश तस्करीस आळा घालण्यासाठी समाजसेवकांनी दिलेल्या सतर्कतेमुळे आज श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली. एका टॅम्पोमधून निर्दयीपणे बांधलेल्या १३ गायींची सुटका करण्यात आली असून, आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेला आहे.

ऑल इंडिया पँथर पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सुषमा शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, बीडवरून परतताना, श्रीगोंदा-जामखेड रस्त्यावर आढळगावजवळील१२ नंबर चारीजवळ एका आयशर टॅम्पो (क्रमांक MH 17 BY 4786) वेडावाकडा जात असल्याचे पाहिले. संशय आल्याने त्यांनी टॅम्पो थांबवून विचारणा केली असता, चालकाने गायी धाराशिवला कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली आणि घटनास्थळावरून पळून गेला.

जेव्हा शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॅम्पो उघडून पाहिले, तेव्हा त्यांना १३ जर्सी गायी निर्दयतेने दोरीने बांधलेल्या अवस्थेत दिसल्या. या गोवंशांची कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेता त्यांची वाहतूक केली जात होती. त्यामुळे गायींना वेदना आणि इजा होत असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि टॅम्पोसह गायी ताब्यात घेतल्या. टॅम्पोची अंदाजे किंमत ₹५ लाख तर गायींची किंमत ₹१.३० लाख इतकी असल्याचे सांगितले जात आहे. पोलीसांनी अज्ञात चालक व मालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारणा २०१५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
स्रोत:(फिर्याद)

Advertise..
