दिनांक १३ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D लगत असलेल्या अतिक्रमणांवर आज श्रीगोंदा नगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि श्रीगोंदा पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. काही दिवसांपूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. आज सकाळी महात्मा फुले सर्कल ते सिद्धार्थ नगरदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या टपऱ्या, फ्लेक्स, शेड आणि इतर अतिक्रमित वास्तू हटवण्यात आल्या.

नगरपालिका व महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या मध्यापासून ५० फूट अंतरावर खुणा करत नागरिकांना अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढली, तर उर्वरित जागा प्रशासनाने रिकामी केली. दुपारनंतर मांडवगण रोडवरही कारवाई सुरू करण्यात आली.

महामार्गालगतच्या काही पक्क्या इमारतींवर दोन दिवसांत कारवाई होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अतिक्रमित जागेवर खुणा करून त्यांना पूर्वसूचना देण्यात आली आहे. दरम्यान, ज्या इमारतींची नोंद अधिकृत मोजमाप पुस्तिकेत आहे, त्या इमारतींना शासकीय मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

शहरातून जामखेड-काष्टी रोडवरील अतिक्रमण हटवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, मात्र राष्ट्रीय महामार्ग विकसित झाल्यानंतर ही मोहीम व्यापक प्रमाणावर पहिल्यांदाच राबवण्यात आली. महामार्गाच्या प्रशासकीय मान्यतेनंतर मोजमाप पुस्तिकेत नोंद असलेल्या इमारतींच्या अतिक्रमणाबाबतही प्रशासनाने कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत.

पोलीस बंदोबस्त आणि शांततेत कारवाई:
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे संपूर्ण कारवाई सुरळीत पार पडली आणि कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. राष्ट्रीय महामार्ग आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्धपणे अतिक्रमण हटवले.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)


