दिनांक ७ डिसेंबर, श्रीगोंदा:
शहरातील नामांकित व पटसंख्या अधिक असलेल्या मुलींच्या विद्यालयात परीक्षा फीच्या नावाखाली मोठी वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण या नियमाला मूठमाती देत, मनमानी पद्धतीने या विद्यालयाचा कारभार चालू असून, विद्यार्थी व पालक या पैसे वसुलीमुळे त्रस्त झाले आहेत.
यानंतर पालक व काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते नमूद विद्यालयाच्या प्रशासकीय प्रमुखांना भेटत त्यांनी या प्रकरणी जाब विचारलायं. मात्र, येथे गेल्यावर विद्यालयातील नियोजनशून्य कारभार, अस्ताव्यस्त झालेली यंत्रणा आणि अस्वच्छतेच्या विळख्यात विद्यालय आल्याचे निदर्शनास आले.
तसेच पालकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादनासाठी ठेवण्यात आलेली प्रतिमा सुस्थितीत नसल्याचे व माल्यार्पणासाठी आणलेला हारही सुकलेल्या फुलांचा असल्याचे तर, अभिवादन कार्यक्रम शाळा सुटण्याच्या वेळी औपचारिक पद्धतीने घेण्यात आल्याचेही स्पष्ट झाले.

याचबरोबर शाळेत मोठ्या प्रमाणात पसरलेली अस्वच्छता, महात्मा फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याला व कर्मवीर आण्णां यांच्या प्रतिमेला धूळ व जाळ्यांनी वेढलेले दिसून आले. एकंदरच येथील शिक्षक, मुख्याध्यापक व इतर सर्व विद्यालयातील पदाधिकारी हे फक्त स्वतःच्या पगारासाठी औपचारिक काम करत असल्यासारखे त्यांना विद्यालयाचे काहीही देणे घेणे नसल्याचं दिसत आहे.

संविधानातील कलम २१(क) नुसार देशातील प्रत्येक शाळांना पहिली ते आठवी या सहा ते चौदा वयोगटातील मुला-मुलींना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याचे निर्देश करण्यात आलेले आहेत. या निर्देशानुसार राज्य शासन त्या त्या शिक्षण विभागांना सूचना करते. मात्र, या नियम व अटी नमूद विद्यालयाला लागू नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाळेची फी द्या. अन्यथा..! परीक्षेला बसू देणार नाही. असा सज्जड दम विद्यालयाचे शिक्षक मुलींना देतात. विद्यालयाच्या असल्या सक्तवसुलीला कंटाळून काही विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याची चर्चा आहे. तर, फीसाठी सामान्य कुटुंबातील एका मुलीने दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीने काम करून, फी भरल्याचे तिच्या पालकाने सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी याच विद्यालयात मागासवर्गीय मुलींचा अवमान करणारी घटना शिक्षकेकडून घडली असल्याचेही यावेळी समजले.
तसेच, पुरातत्त्व विभागाच्या नियमांना मूठमाती देत काही गंभीर प्रकार या विद्यालयात घडल्याचे ही समोर आले आहे. फी साठी विद्यार्थ्यांना सक्ती करणारे विद्यालया बाहेरील टवाळखोरी थांबवण्यास मात्र, असमर्थ आहेत. एकंदरच विद्यालय भरतांना व सुटतांना होणाऱ्या या त्रासासह विद्यालयातुनही फिसाठी होणारी पिळवणूक, येथील विद्यार्थिनींना शिक्षणापासून दूर लोटण्यास कारणीभूत तर नाही ना.? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
शाळेत होत असलेल्या या सर्व प्रकारांचा पाडा पालकांनी गट शिक्षण अधिकारी शिंदे यांच्या कानावर घातला असून, त्यांनी सुधारणेच्या सूचना नमूद शिक्षक व प्रशासकीय प्रमुखांना दिल्या आहेत. तर, लवकरच सुधारणा करू, असे आश्वासन शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांना दिले आहे. अपेक्षित सुधारनांसह सर्व विद्यार्थिनींची फी माफ न झाल्यास..? आंदोलन करणार असल्याचे या पालकांनी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(पालकांची तक्रार)
बातमीसाठी प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
