दिनांक ९ जुलै २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील बनावटी लग्न करून फसवणूक करणारी अंतरराज्यीय टोळी पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केली आहे. नितीन अशोक उगले (वय ३१ वर्षे, मुंगूसगाव, ता. श्रीगोंदा, नि. अहमदनगर) यांनी दिनांक २८ जून २०२४ रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केलेल्या आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस आरोपी हिच्यासोबत लग्न करून संसार करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी २ लाख १५ हजार रुपये घेतले व यवतमाळ येथून चारचाकी गाडी बोलावून त्यांच्याशी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीची आईने आरोपींना पकडले असता, आशा गौतम पाटील हिने तिच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून हल्ला केला व हाताने मारहाण केली.
आरोपी आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, शेख शाहरुख, शेख फरीद, दिपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील, सचिन बलदेव राठोड. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासाच्या दरम्यान, पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर भोसले यांच्या नेतृत्वाखालील टीमने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फसवणुकीची रोख रक्कम व चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण १३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
तपासकामात मा.राकेश ओला, (पोलीस अधीक्षक, अहमदनगर), मा.प्रशांत खैरे, (अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर) आणि मा.विवेकानंद वाखारे, (उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.ज्ञानेश्वर भोसले, (पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा) यांच्या नेतृत्वाखालील टीम कार्यरत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






