दिनांक ९ जुलै २०२४, श्रीगोंदा:
दिनांक २ जुन २०२४ रोजी, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भिमा नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत महत्त्वपूर्ण तक्रार करण्यात आली. पुलाचे काम दर्जाहीन होत असल्याची माहिती देत, श्री. विनायक पांडुरंग मगर यांनी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांना तक्रारी अर्ज सादर केला.
श्री. मगर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, काम चालु असताना कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंत्यांना तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुलाच्या कामाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी थर्ड पार्टी गुणवत्ता तपासणी पथक नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या मते, कॉक्रिट क्युब टेस्ट, बेरींग कॅपेसिटी, स्टील डिजाईन इत्यादी बाबी तपासून पाहिल्या जाणे आवश्यक आहे.
तसेच, कामाची पाहणी व गुणवत्तेची शहानिशा करून बिल अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदारीचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. पुलाचे ठेकेदार विजय एस पटेल यांच्या ठेके काढून अनुभवी एजन्सीकडून काम करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे.
तक्रारीची दखल न घेतल्यास आपल्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात येईल, असेही त्यांनी आपल्या अर्जात स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी आज उपोषण चालू केले असून यासाठी गार येथील ग्रामस्थ व विनायक मगर आणि त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. सदरील धरणे आंदोलन चालू असून मागण्या पूर्ण होईपर्यंत हे उपोषण चालू राहणार असल्याचे आंदोलकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
स्रोत:(उपोषण)






