कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग; सिलॉन कंपनीच्या एचआर हेडला मारहाण, लुटमार करणारी टोळी गजाआड..

दिनांक २ जून २०२६, श्रीगोंदा:

म्हसणेफाटा एमआयडीसीतील सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा. लि. कंपनीच्या एचआर हेडला कॉन्ट्रॅक्ट न दिल्याच्या रागातून मारहाण करून सोन्याची चैन लुटणाऱ्या टोळीविरुद्ध सुपा पोलिसांनी कारवाई केली आहे.

या प्रकरणी एक आरोपी अटकेत असून दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा. लि. कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी वैभव रामदास रिकामे (रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) हा कंपनीचे एचआर हेड महाडीक यांच्याकडे गेला होता. मात्र कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याने त्याने वडनेर हवेली (ता. पारनेर) येथील सतीश मोहन भालेकर यांच्या सांगण्यावरून कट रचल्याचा आरोप आहे.

रुई छत्रपती फाटा परिसरात महाडीक यांची दुचाकी अडवून आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच “सुपा एमआयडीसीत कामाला येऊ नकोस” अशी धमकी देत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान वैभव रिकामे याला अटक करण्यात आली. तसेच दोन विधीसंघर्षित बालकांना बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी व चार विधीसंघर्षित बालक फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, सुपा व म्हसणेफाटा एमआयडीसी परिसरातील उद्योग व्यवस्थापकांना पोलिसांनी आवाहन केले आहे. कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली दमदाटी, खंडणीची मागणी, दबाव किंवा इतर कोणताही त्रास होत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे..

औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही सुपा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, पोलिस कर्मचारी मरकड, माळवदे, सातपुते, कोल्हे, गायकवाड आदींच्या पथकाने केली.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading