दिनांक २ जून २०२६,श्रीगोंदा:
शासकीय ओढ्याच्या मुद्द्याचा गैरवापर करून प्रशासनाची दिशाभूल, खोटे आरोप करून बदनामी, न्यायालयीन निकालाचा अवमान तसेच संशयास्पद सह्यांच्या आधारे निवेदन सादर केल्याचा आरोप करत विलास उर्फ संजय मारुती मोटे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, काही व्यक्तींनी २० मार्च २०२६ रोजी प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात मोटे यांच्यावर शासकीय ओढा बुजविल्याचा आरोप केला आहे. मात्र संबंधित गट क्रमांकांमधील जुना शासकीय ओढा नगरपालिका नकाशामध्ये स्पष्टपणे दर्शविलेला असून ओढ्याच्या पात्रामध्ये घरे, गोठे व इतर बांधकामे झाल्याची बाब चौकशीत समोर येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे स्वतःचे अतिक्रमण लपविण्यासाठीच खोटे आरोप करण्यात आल्याचा आरोप मोटे यांनी केला आहे.
मोटे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, सदर जागेबाबत सन २००५ मध्ये न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागलेला असून त्यांच्या वहिवाटीमध्ये अडथळा आणू नये, असा मनाई आदेशही देण्यात आला होता. असे असतानाही काही व्यक्तींकडून वारंवार अडथळे निर्माण करून खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे २० मार्च २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनावरील २७ सह्या या सह्यांबाबत संशय व्यक्त करण्यात आला असून सर्व संबंधितांना समक्ष उपस्थित करून सह्यांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सह्या खोट्या अथवा बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित व्यक्तींकडून सुमारे १०० फूट रुंदीचा शासकीय ओढा असल्याचा दावा करण्यात येत असल्याने महसूल, भूमी अभिलेख व नगरपरिषद विभागामार्फत संयुक्त मोजणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी मोटे यांनी केली आहे. शासकीय ओढ्यातील कथित अतिक्रमणांची चौकशी, न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तसेच प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करावी, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे श्रीगोंद्यातील कथित शासकीय ओढा, अतिक्रमण, न्यायालयीन आदेश आणि संशयास्पद सह्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(निवेदन)
