दिनांक २९ सप्टेंबर २०२५ श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या विविध अडचणींबाबत तहसीलदार सचिन डोंगरे यांना निवेदन सादर केले जिल्हाध्यक्ष सतिष अरुणकाका हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.

दुकानदारांनी प्रामुख्याने खराब धान्य पुरवठा, धान्याच्या वजनातील तफावत आणि गाडीवाल्यांकडून होणारी टाळाटाळ या गंभीर समस्या तहसीलदारांसमोर मांडल्या.

तहसीलदारांकडून त्वरित कार्यवाहीचे आश्वासन
तहसीलदार सचिन डोंगरे यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत दुकानदारांना त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला.

- ज्या दुकानांमध्ये खराब धान्य आले आहे, ते तातडीने बदलून दिले जाईल.
- प्रत्येक धान्याची गोणी वजन करूनच दिली जाईल. तसा शासन आदेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
- गाडीवाल्याने धान्य मोजून देण्यास टाळाटाळ केल्यास, दुकानदारांनी त्वरित तहसीलदारांना फोन करून माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
- तहसीलदार डोंगरे यांनी तातडीने आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल उपस्थित स्वस्त धान्य दुकानदारांनी समाधान व्यक्त केले. तसेच, अहिल्यानगर स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

याप्रसंगी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदारांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक दिवसांपासूनच्या अडचणींवर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
स्रोत: (प्रसिद्धी पत्र)
