काष्टी (श्रीगोंदा): रस्त्यात गाडी आडवी लावून मातंग युवकास जातीय शिवीगाळ; ‘नकली पिस्तूल’ दाखवून जीवे मारण्याची धमकी, एकावर गुन्हा दाखल!

दिनांक ३० सप्टेंबर २०२५ श्रीगोंदा:

तालुक्यातील काष्टी गावामध्ये जुन्या वादातून रस्त्यात अडवणूक करून एका मातंग समाजातील युवकाला जातीवाचक शिवीगाळ करत नकली पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना काल, सोमवार दिनांक २९/०९/२०२५ रोजी रात्री ९.०० वाजताच्या सुमारास घडली आहे.

या प्रकरणी पीडित युवकाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी आकाश बाळासाहेब साळवे (वय २६, रा. काष्टी) आणि आरोपी वैभव सुभाष सुतार (रा. काष्टी) यांच्यात सुमारे दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तो वाद गावातील लोकांनी मिटवला होता.

मात्र, काल रात्री आकाश साळवे हे त्यांचा मित्र अतुल पाचपुते आणि प्रशांत भोर यांच्यासह दुचाकीवरून जात असताना, जय भवानी चौक येथे आरोपी वैभव सुतार याने आपली चारचाकी गाडी रस्त्यात आडवी लावली होती.

रस्ता मोकळा नसल्याने आकाश साळवे यांनी हॉर्न वाजवला. यावर संतापलेल्या वैभव सुतारने गाडीतून उतरून त्यांच्या हातातील नकली पिस्तूलाने आवाज केला आणि आकाशला ‘मांगांनो तुम्हाला माझे काय वाकडे करायचे ते कर, तुम्हाला जीवचं मारुन टाकतो,’ अशी जातीवाचक शिवीगाळ केली. ‘गेल्या वेळेस वाचला, आता तुला सोडणार नाही,’ अशी धमकीही त्याने दिली.

यानंतर आकाश साळवे यांनी तातडीने डायल ११२ वर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. थोड्याच वेळात श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी आरोपी वैभव सुतार याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतरही आरोपी मोठ्याने शिवीगाळ करत धमक्या देत होता.

पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला नेले. यावेळी चौकशीत वैभव सुतार याच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल हे नकली असल्याचे स्पष्ट झाले.

या संपूर्ण प्रकाराबद्दल आकाश साळवे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी वैभव सुतार याच्या विरोधात रस्त्यात अडवणूक, जातीय शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी आणि नकली पिस्तूलाचा धाक दाखवल्याबद्दल लेखी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading