दिनांक ३० सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा:
सध्याच्या काळातही समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा व जातपंचायतीचा पगडा कायम आहे. या गंभीर सामाजिक समस्यांना मूठमाती देऊन पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले संविधान गट आणि संजीवनी संविधान गट यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीगोंदा येथे राज्यस्तरीय पारधी युवक-युवती निर्धार परिषद नुकतीच संपन्न झाली.

या परिषदेत अंधश्रद्धा, क्रूर प्रथा आणि जातपंचायतीला मूठमाती देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सचिव गोरक्ष लोखंडे होते. प्रास्ताविकात अजित भोसले यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, जातपंचायतीविरोधात कठोर भूमिका घेत अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, बालविवाह, बालमजुरी आणि भिक्षा मागणे याविरोधात सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला आहे.

युवक-युवतींनी या परिषदेत सक्रिय सहभाग घेतला. तनिषा भोसले यांनी जातपंचायतीचे दुष्परिणाम, अनुष्का भोसले यांनी बालविवाह, उज्वला मदने यांनी भटकंती व समस्या, तर शुभांगी पोटे यांनी शासकीय गायरान जमीन व योजनांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरक्ष लोखंडे यांनी पारधी समाजाच्या युवक-युवतींनी शिक्षण, रोजगार व व्यवसाय यामध्ये प्रगती करून स्वतःचा विकास साधावा, असे आवाहन केले. त्यांनी ठरावांचे अभिनंदन करत अंधश्रद्धा व जातपंचायतीला मूठमाती देणे हे समाजपरिवर्तनाचे पहिले पाऊल असल्याचे नमूद केले.
गेल्या तीन वर्षांपासून श्रीगोंदा तालुक्यात सुरू असलेल्या संविधान जागृती कार्यातून समाजाच्या शिक्षणाचा अभाव, आरोग्य, निवारा, रोजगार संधींचा अभाव आणि अंधश्रद्धा व जातपंचायतीचे बंधन या समस्या उघड झाल्या आहेत.

परिषदेत पारधी समाजाच्या युवक-युवतींनी आपल्या विकासासाठी काही महत्त्वाच्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.
- अंधश्रद्धा, क्रूर प्रथा आणि जातपंचायतीविरोधात जनजागृती.
- बालविवाह आणि कौटुंबिक हिंसेस विरोध.
- महिलांवरील अन्यायकारक बंधनांचा निषेध.
- पारधी मुलींचे किमान बारावीपर्यंत शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन.
- रोजगारासाठी शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी.
- आरोग्य शिबिरे व योजना समाजापर्यंत पोहोचवणे.
- गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून घरे व जमिनी पारधी समाजाच्या नावावर करणे.
याप्रसंगी अजित भोसले, अँड. नितीन शिंदे, राजु काळे, लखन शिंदे, जॉकी पवार, रामसिंग भोसले, चिराजी चव्हाण, रतन पवार, आपला काळे, भाऊ पवार, धीरज भोसले, चेतन भोसले, मुकेश भोसले, विठ्ठल काळे, किरण काळे, जयश्री काळे, सपना भोसले, उज्वला मदने, अनुक्षा भोसले, तनिषा भोसले आदी मान्यवरांसह फुले संविधान गट, संजीवनी संविधान गट व पारधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयश्री काळे यांनी केले.
या परिषदेच्या माध्यमातून युवक-युवतींनी स्त्री-पुरुष समानता, संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा ठोस संकल्प केला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
