दिनांक ३० सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा आणि नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत निवेदन दिले.

गेल्या काही दिवसांत विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल, बंधारे यांसारख्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत पूर आल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तातडीने निधी मंजूर व्हावा, यासाठी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना औपचारिक निवेदन सादर केले.

यावेळी आमदार पाचपुते यांनी अतिवृष्टीमुळे शेती, फळबागा, पशुधन, घरे इत्यादींचे झालेले नुकसान लक्षात घेता, सर्व पिकांचे सरसकट पंचनामे तातडीने करण्याची विनंती केली.

शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. आमदार पाचपुते यांनी मुख्यमंत्री महोदयांशीही यासंदर्भात थेट चर्चा करून सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना तातडीने संबंधित विभागांना पारित करण्याची मागणी केली आहे.

नैसर्गिक संकटात अडकलेल्या शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी केली आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
