लोणी व्यंकनाथमध्ये मध्यरात्री कोयत्याने हल्ला; दगडफेक-शिवीगाळीतून तणाव, पोलिसांची कारवाई..!

श्रीगोंदा, दि. २५ ऑगस्ट २०२५:

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावात कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने गंभीर हल्ला करून जखमी केले. एवढ्यावरच थांबता न राहता आरोपींनी दगडफेक, शिवीगाळ आणि धमकी देत गावात दहशत माजवली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते ११:३० वाजण्याच्या सुमारास पीडित तरुण आपल्या नातेवाईकांच्या घरी जेवत असताना त्याला गावातील शाळा व ज्युनिअर कॉलेज परिसरात बोलावण्यासाठी फोन आला. मात्र, तो न गेल्याने पाच जणांचा गट शस्त्रसज्ज अवस्थेत घरासमोर पोहोचला. आरोपींपैकी एकाच्या हातात कोयता होता, तर इतरांकडे लाकडी दांडके होते.

वादाची कारणे सांगत आरोपींनी जातीयतेवरून शिवीगाळ केली आणि एका आरोपीने कोयत्याने डोक्यावर वार करून तरुणाला गंभीर जखमी केले. त्यानंतर इतरांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण करत शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मध्यस्ती करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील काही नागरिक पुढे आले. त्यावेळी आरोपींनी पळून जाताना ग्रामपंचायत सदस्यांच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ केली.

जखमी तरुणाला त्याच्या नातेवाईकांनी तातडीने श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्याच्या डोक्यावर सहा टाके घालण्यात आले असून सध्या तो धोक्याबाहेर आहे.

घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या विरोधात मारहाण, जातीय अत्याचार, जीव घेण्याची धमकी, दगडफेक यांसह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading