बलुतं.दया पवार.(भाग १३).

बलुतं..

घराण्याशी सलग अशी दुःखाची माळ दिसू लागते , आजोबा , दादा , तात्या . हे सारं पाहून मी हादरून जातो . अलिकडे हाच वारसा आपला चुलतभाऊ चालवतोय . कमालीचा अल्कोहोलिक झालाय . त्याला परावृत्त करण्यात मी अपयशी झालोय .

म्हणजे मी दारूला शिवत नाही असं नाही . थोरामोठ्यांच्या मांडीला मांडी लावून अलिकडे मी बसतोय . त्यांच्या नादानं एखादा पेग मी घेतो . पण खरं सांगू का , पिण्यापेक्षा समोर ठेवलेले पदार्थ खाण्यावरच माझं जादा लक्ष असतं . एक काळ असा होता , की दारू आपल्यास गिळंकृत करील , ही भीती होती . पण आज तसं काही वाटत नाही . जीवनाची आतून जी झिंग चढलीय ना , तिच्या नशेपुढं ही नशा खूपच फालतू वाटते !

घरातील सामानाबद्दल , दादांच्या सर्वच वस्तूंबद्दल काही अशी घृणा नव्हती . ते वाजवीत असलेलं ‘ कांडं ‘ मनापासून आवडायचं . ते बराच काळ भिंतीवरच्या खुंटीवर होतं . एकांतात त्यातील सूर मला ऐकू यायचे , वाजवता मात्र कधीच आलं नाही . दादांचा हा दुर्मिळ ठेवा हातातून गेला , ह्याचं दुःख होतं . दिवसेंदिवस पुस्तकी होत चाललो . महारवाड्यातून जाणिवेच्या पातळीवर दूर जाऊ लागलो .

या सगळ्या आठवणींचे साल नक्की सांगता येणार नाही . पण स्वातंत्र्याची जिलेबी चवथीच्या वर्गात मिळाल्याची आठवण आहे . भारतमातेचा पुतळा असलेला चकचकीत बिल्ला वर्गात मिळालेला . छातीवर अभिमानानं मिरवत होतो . पण स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय झालं ? जीवनात तसा कोणताच बदल झालेला आठवत नाही . गावातील पुढाऱ्यांची भाषणे शाळेत झालेली . ते जे काही बोलत होते , ते टाळक्यात शिरत नव्हतं .

वर्गात तसा मी चुणचुणीत . मुंबईहून वाकड्या नळाचं पाणी पिऊन आलेलो . शाळेत कुणी सुपरवायझर आला , तर धीटपणे उभे राहून त्यांच्या प्रश्नांना मीच उत्तर द्यायचो , कविता चांगल्या सुरात गायचो . शाळेत माझा गणित विषय मात्र कच्चा . कुठल्या तोटीतून पाणी कुठल्या हौदात गेलं , हे काळ – काम – वेगाचं गणित डोकं खाजवूनही कळायचं नाही . भाषा , इतिहास हे विषय म्हणजे हातचा मळ , चवथीत मी धरून तशी पाच मुलं . अंगकाठीनं मीच एकटा किरकोळ . बाकीची मुलं धष्टपुष्ट . भगवंत आवारी तर उंच धडंग , गोरापान . एका बुक्कीत मला खाली बसवील , असा ; पण वागायचा माझ्याशी प्रेमळ .

गणितात वार्षिक परीक्षेला मी नापास झाला होतो . ” बाकीची मुलं तालुक्याच्या गावी शिकायला जाणार . ह्याला एकट्यालाच इथं कशाला ठेवा ? ” असा सुज्ञ विचार मास्तरांनी केला असावा बहुधा . त्यांनी बळंबळं ग्रेस मार्क देऊन मला पुढच्या वर्गात ढकललं .

मला पुढं शिकवावं की नाही , हा प्रश्न बहुधा आईपुढं असावा . महारवाड्यातील उमाआज्याचा आईला सल्ला

” सखू , कह्याला पोराला साळंत धाडतेस ? आपण का वानीबामन हावोत ! फिरल गलोगली आन् खाईल डलीडुल्ली . न्हाई तर जाईल गुऱ्हाकडं . तेवढीच राखुळी यील . व्हईल तुला मीटमिरचीला !

आईनं उम्याआज्यांचा सल्ला मानला नाही . आपल्या मुलाला शिकवावं , मोठा साहेब करावा , ही उर्मी तिला त्या काळी कुणी दिली असावी बरं ?

बाबासाहेब म्हणत , ” महाराच्या बाईला मुलांसंबंधी डोहाळे कोणते लागतात ! -तो प्यून व्हावा किंवा शिपाई व्हावा . पण ब्राह्मणाच्या बाईला डोहाळे लागतात : आपला मुलगा कलेक्टर व्हावा ! असे डोहाळे महार आयांना का बरं लागू नयेत ?

” ह्या भाषणाचा तर आईवर नकळत परिणाम झाला नसावा ना ? मी तालुक्याच्या गावी शाळेत जाऊ लागलो . सकाळ – संध्याकाळ तीन मैलांची रपेट करू लागलो .

उमाआज्यावरून आठवलं . जसं आठवतं . तसं एक लक्षात आलेलं . उमाआज्या म्हणजे आमच्या घराण्याच्या पाचवीला पुजलेला . तसा आम्ही काही त्याचा कधी बांध घेतला नव्हता . पण असते एकेकाला सवय काड्या घालण्याची ! कुणाचं बरं चाललं तर ह्यांच्या पोटात दुखू लागतं . उमाआज्याचाही तसाच स्वभाव . असं असलं , तरी उमाआज्याचा द्वेष वाटायचा नाही . मोठं कुतूहल वाटायचं ; एक तर तो भुताखेतांच्या गोष्टी सांगायचा . निळावंतीबद्दल बोलायचा . ” निळावंती वाचल्यामुळं पशुपक्ष्यांची भाषा समजते . माणसं थुकीनं मारता येतात ‘ असं काहीवाही तो निळावंतीबद्दल बोलायचा . आपण तरुणपणी धोडाळीवर सांबराच्या जंगलात निळावंती वाचायला गेलो आणि पाच फडांचा नाग कसा अवचित पुट्यात येऊन फिस्कारला . हे तो अनेकदा न कंटाळता आम्हा पोरासोरांना निवाच्या पाराखाली सांगे . ही निळावंती मात्र आपण त्याच्याकडे केव्हाच पाहिली नाही . पिवळ्या कागदाच्या रामायण – महाभारताच्या पोथ्या मात्र त्याच्या घरात देव्हाऱ्यावर असायच्या . वाचण्यासाठी ऊर्मी यायची , पण तो हात लावू देत नसे .

अशा ह्या उमाआज्यानं एक क्षुल्लक घटना सांगून माझ्या जीवनात केवढं मोठं वादळ उभं केलं ! आजही त्या घटनेची आठवण झाली , म्हणजे जिवाचा थरकाप होतो , आपण एवढं क्रूर कसं वागलो ? उभ्या हयातीत ह्या प्रसंगाची जखम आई विसरली असेल का ? आईच्या चारित्र्याबद्दल संशय घ्यावा , आणि तोही मुलानं ?माझं वय तरी केवढं ! हे सारं चारित्र्यहनन समजण्याचं माझं वय तरी होतं काय ?

एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर उमाआज्याकडे पारावर गप्पा मारत बसलेलो . म्हातारा कावेबाज होता . एखाद्या गवताच्या गंजीत पटकन काडी टाकावी , तसं त्या वेळी घडलं . मला म्हणतो कसा !

” काय रं , पोरा ! तुहा बा मरून गेलाय आणि तुही आई पोटुशी ! हे र कसं ? ” झालं ! ह्या पेटल्या काडीनं माझं मन धडाड पेटलं . जीव कासावीस होऊ लागला , डोक्यात प्रश्नाचं काहूर . काय करू आणि काय नाही , असं झालं . मुंबईला असताना कावाखान्यात असलेल्या काही विधवा बायांचे अनेक किस्से मी ऐकलेले . एकदा तर कचऱ्याच्या डब्यात नुकतंच जन्मलेलं कोवळं मूल मी पाहिलेलं . घरी घुसमटतच येतो . बघतो , तो आई अंथरुणाला खिळलेली . आईचं तोंड पाहूसं वाटत नाही . तिच्याबद्दल नसानसांतून घृणा भरलेली . शेजारची म्हातारी बाई चुलीवर पाणी तापवत असते . म्हातारी मला सरपण आणण्यास पिटाळते

” ए पोरा ! तुही आई दुपावलीय .

” माझा तोल जातो . मी नाही नाही ते बोलतो . बाप मेला असताना गरोदर कशी , हा माझा प्रश्न , आईला हसावं की रडावं हे कळत नाही . ती बावळटासारखी माझ्या तोंडाकड पाहते . म्हातारी माझी समजूत काढते . तरी आईचं आणि माझं दोन – तीन दिवस भाषण नाही . पुढ्यात येईल ते खात होतो आणि शाळेला जात होतो . शेवटी एका रात्री आईच्या मनाचा बांध फुटतो . ती गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागते . सारा प्रकार खुलासेवार समजावून सांगते . खरं म्हणजे दादा असतानाच आईला दोन – तीन महिले गेलेले असतात . हे सारं जेव्हा समजतं , तेव्हा नरकातून काढल्यासारखी माझी अवस्था होते . आपल्या समजुतीच्या घोटाळ्यामुळे आईला केवढं मरणाचं दुःख दिलं ! पुढील आयुष्यात आईला कधी दुखवायच नाही , याची मी मनात खूणगाठ बांधतो . आई मात्र कधी हा प्रसंग विसरली नाही . बायकांत ती गप्पा मारत बसली असता तिला हा प्रसंग हटकून आठवे आणि साऱ्या बाया माझ्या बावळटपणाला हसत .

माझ्या आयुष्यातलं हे भयानक प्रकरण , मी एक – दोन वर्षापूर्वी विचारलं असतं तर नसतं सांगितलं . माझीच मला भीती वाटायची . थरकाप व्हायचा . पण एकाला तरी आयुष्यातील सारं खरं सांगावं , हा माझ्या आईचाच वसा . तिनंच हे बळ दिलंय । मीही माझा भूतकाळ विसरण्याचा खूप प्रयत्न केला . पण भूतकाळ असा सहजासहजी पुसला जातो काय ! काही दलितांना हे सारं उकिरडा उपसल्यासारखं वाटतं . पण माणसाला आपला भूतकाळ माहीत नसेल , तर त्यालाही पुढं कुठं जायचं ते कळणार नाही .

क्रमशः

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading