बलुतं..
काही तरी आक्रीत करतो काय ? ” आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता . एक गोष्ट मात्र खरी , की सलमामुळे आपला मुलगा माणसात येतोय , हसतोय , बोलतोय . ह्यामुळं आई सलमाचा केव्हाच राग करायची नाही . त्या वेळी आईनं मला खारीक – खोवार लावलेलं . सलमा घरी आली , तर आई तिला हा खुराक आग्रहानं खाऊ घालायची . त्या वेळी मी एक मजेशीर गोष्ट पाहिली . मुसलमान सियांना जरी संशय आला होता , तरी कुणी आपल्या नवऱ्याला माझ्यासंबंधी सांगत नव्हतं , हे विशेष . त्यांना बहुधा हे माहीत असावं , की एकदा हे पुरुषात गेलं तर नाहक खूनखराबा होईल . एक धेडका बच्चा आपल्या पोरीच्या नादाला लागलाय , एवढी गोष्टही त्याचं माथं फिरायला पुरेशी होती .
सापानं कात टाकावी , तशी माझ्या मनानं आणि देहानही कात टाकलेली . मी पहाटेच उठून व्यायामशाळेत जाऊ लागलो . चांगले कपडे वापरू लागलो . कुणी तरी माझ्यावर प्रेम करतंय , ही भावनाच रोमांचकारी वाटायची . सलमा आणि माझा शारीरिक संबंध येणं तसं शक्यच नव्हतं . तिच्यावरही खूप पाळत असावी . पण शरीराचा मी वीट येईपर्यंत भोग घेतला होता . तिच्या बाबतीत तसं आकर्षण मला वाटत नव्हतं . पण तिला पाहताच लैंगिक विकृती आपोआप जात चाललीय , ह्याचा साक्षात्कार होऊ लागला . इंद्रियाची थरथर थांबली . सर्व अंगभर पुरुषार्थाच्या विजेचा लोळ सुरू व्हायचा . माझंच मला नवं दर्शन होत होतं . आता वाटते , हा माझा पुनर्जन्मच होता . पाच – सहा महिन्यांत माझ्यात क्रांतिकारक बदल झाला होता . सहा महिन्यांपूर्वी मला पाहिलेली माणसं मला आज ओळखू शकत नव्हती . एका स्त्रीमुळं मी पुरा उद्ध्वस्त झालो होतो , तर दुसऱ्या स्त्रीनं मला जीवदान दिलं होतं . स्त्रीचं आयुष्यातील सामर्थ्य नव्यानंच ध्यानात आलं होतं .
सलमाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही काव्यासारखी हुरहूर लावणारी होती . तिला जर सांगितलं , की ‘ डोक्यावरचा , दुपट्टा खाली कर , ‘ तर ती मुळीच ऐकायची नाही . अर्थात आपचं हे सारं संभाषण खुणेनंच चाले . मात्र दुसऱ्या वेळी समोर आली , म्हणजे तिचा दुपट्टा डोक्यावर नसायचा .
एका क्षुल्लक घटनेमुळं मला तिच्यासंबंधी गाढ आत्मीयता वाटली . घटना तशी साधीच . ईदच्या सणाला ह्या वस्तीत नुसतं चैतन्य सळसळायचं . रोज्यांच्या दिवसांत फकीर गाणं गात आणि डफ वाजवीत यायचा , लोकांना उठवायचा . ईदच्या दिवशी सलमा खूपच सजायची . हाताला मेंदी , डोळ्यांत सुरमा , भांगात मोत्याचा चुरा , रंगीबेरंगी फुलाफुलांच्या डिझाइनचे कपडे . तिचा थाट बघत राहावासा वाटे . ईदच्या सणाला इथली मंडळी शिरखुर्मा हा मोठा नामचंद पदार्थ बनवीत . तो शेवया आणि दूध यांच्या सह्याने करत.
सलमाचं सासर भेंडीबाजार इथं होतं . तिला कुणी तरी फिटर नवरा मिळाला तिच्याकडे अवाक् होऊनच पाहत होतो . पाय आपटत रागानं ती आतल्या खोलीत गेली आणि कपडे बदलून आली . ह्यावेळी तिच्या अंगावर चुरगळलल जुने कपडे होते . घरात जाऊन रडल्याच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या . ह्या वेळी मी खरा घाबरलेलो . मी ह्या प्रकरणाकडे केवळ गंमत म्हणून पाहत होतो . पण पोरगी खरंच प्रेमात पडली की काय , म्हणून मी चिंतातुर झालेलो .
मी किती डरपोक आहे , याची प्रचीती मला लगेच आली . तिनं एकदा एका लहान मुलापाशी चिट्ठी पाठवलेली . बघतो , तो ती उर्दूत लिहिलेली . आता आली का पंचाईत ? ही वाचायची कशी ? शेवटी एका लहान मुलांच्या उर्दू शाळेपाशी जाऊन उभा राहिलो . एका मुसलमान मुलाकडून ती वाचून घेतली . ” मेरे शाहजादे ! ” ह्या पहिल्याच शब्दानं उडालो . पुढचं ऐकलं , तेव्हा माझ्या अंगाला घाम सुटलेला . घरातून पळून जाण्याची सूचना तिनं केली होती . आपण खरंच हिला पळवून कुठं बरं घेऊन जाणार ? ह्या दृष्टीनं मी तिचा विचार केव्हाच केला नव्हता . समजा , पळवून नेली ; तर तिचा बाप आपल्याला जमिनीतून खणून बाहेर काढील . काय करावं , हे कळेना .
नागपाड्याला पाहिलेली एक घटना आठवली . असाच महाराचा एक पोरगा एका मुसलमान मुलीच्या प्रेमात पडलेला . गवगवा झाला . त्याला गल्लीतल्या मुसलमान समाजानं मशिदीत नेलं आणि त्याची सुंता केली . पुढील दहा – पंधरा दिवस कमरेला लुंगी गुंडाळून गरमी झाल्यासारखा चालत होता .
तसं आपलं झालं , तर काय करायचं ? सलमा आणि माझ्यामध्ये धर्माच्या किती मोठ्या प्रचंड भिंती उभ्या आहेत , याची जाणीव झाली . पुढे पुढे मी सलमाची नजर टाळू लागलो . ती ‘ डरपोक ‘ म्हणून मला येता – जाता चिडवायची . पुन्हा एकदा आयुष्यात हरलो होतो .
जो दिवस कधी उगवू नये असं वाटत होतं , तो दिवस उगवलाच . फुलाफुलांचा अंगभर सेहरा बांधून दुल्हा सलमाच्या दारापुढं उभा राहिला . घोड्यावर बसून आला होता . तो उतरला तेव्हा काही मंडळी त्याला पंखा घालत होती . सलमाच्या घरात मुसलमान स्त्रिया ढोलकवर गाणी गाऊ लागल्या . लग्नाच्या दिवशी सलमाचं नखही दृष्टीस पडेना . खूपच वेचैन झालो . पण सईच्या वेळी कोसळलो , तेवढा काही कोसळलो नाही . दाव सहन करण्याची माझ्या मेंदूला बहुधा सवय झाली असावी . तिच्या लग्नात मोठा तोहफा देण्यास मात्र मी विसरलो नाही .
ऑफिसातून सुटलो , की आपोआप भेंडीबाजाराच्या दिशेनं पाय वळायचे . एवढ्या मोठ्या भेंडीबाजारात सलमाचं घर नेमकं कुठं असेल , हाही प्रश्न होताच , थोडाफार हा वेडेपणाच होता . एकदा तर मशिदीत गेलो . कुणी तरी सांगितलं होतं , की सलमाची खिडकी मशिदीतून दिसते म्हणून . तो बोलण्यातला धागा पकडला होता . मशिदीच्या तलावात हातपाय धुणारे , वजू करणारे मुसलमान माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत होते . हा कोण काफर आलाय , असा भाव त्यांच्या दृष्टीस होता .
असाच एकदा संध्याकाळी रस्त्यावर फिरत असताना दुसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीतून सलमानं मला पाहिलं . मला ऐकू जाईल अशा पद्धतीनं माझ्या नावाचा पुकारा केला . मी जागच्या जागीच खिळलो . वर आवाजाच्या दिशेनं बघतो , तर सलमा मला वर बोलावीत होती . मनात संभ्रम दाटलेला , वर जाऊन सांगायचं काय ? तिच्या घरातील मंडळींना आपला संशय तर येणार नाही ना ? तसाच घरी परतलो . सलमाचं धारिष्ट पाहून अचंबाही वाटला .
सलमा जेव्हा पुढं केव्हा तरी माहेराला दोन दिवसांसाठी आली , तेव्हा तिनं मला फैलावर घेतलं . “ तू घरी का आला नाहीस ” म्हणून विचारणा केली . काही कळेना . तिच्या सासरच्या माणसांना ही माझ्याबद्दल काय बरं नातं सांगेल ? एक हिंदू तरुण मुसलमान मुलीकडे प्रेमाच्या भावनेनं बघतो आहे , ही कल्पनाच त्यांना अशक्य कोटीतली वाटली असती . सलमा ज्या ज्या वेळी माहेराला यायची , तेव्हा मला ‘ लग्न कर ‘ म्हणून आग्रह करायची . माझं असं पंतंग तुटल्यासारखं एकाकी आयुष्य तिला छळत असावं .
एकदा मी खरंच तिच्या घरी जाण्याचं धाडस केलं . दुपारची वेळ होती . तिचा नवरा कामाला गेला होता . म्हातारी सासू होती . माझ्या येण्यामुळं सलमाला खूपच आनंद झालेला . माझा आदरसत्कार कसा करावा , म्हणून ती भांबावून गेलेली . तिनं सासूला थंड लेमन आणण्यासाठी खाली पाठवलं . मी ह्या वेळी सलमाकडे निरखून पाहिलं . ती गरोदर होती . मला , का कुणास ठाऊक , आनंद होतो . मी तिला हसत म्हणतो- अर्थात तिच्या ठसठशीत पोटाकडे पाहत ,
“ इसमें मेरा भी हिस्सा है ना ? ” ती ह्यावर जे उत्तर देते , ते ऐकून चाट पडतो . म्हणते कशी , ” अभी मुँह धोके आ ! ” अशी ही सलमा . तिनं एकदा तिचा फोटो दिला होता . तो आजही पेटीच्या तळाला असेल . एवढ्या वर्षांतही तो मला फाडावासा वाटला नाही . तिनं आणखीही एक वस्तू दिली होती..
क्रमशः
(बलुतं या दया पवार यांच्या आत्मचरित्रातुन)
