बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग २४).

बनगरवाडी..

ते बापड्या बालट्याच्या पोटात ठरत नसे. खाल्ले अन्न त्याच्या अंगी लागत नव्हते, आणि जवान होऊन तो जागचा उठत नव्हता. बाळा बनगर अजून पांढरीपुढे नमते घेत नव्हता. गाव त्याची नाना परींनी अडवणूक करीत होता आणि चिकट बाळा अजून होता त्याच जागी स्थिर होता. शेकू आणि त्याची मुंडाहात उंच बायको रानात राबत होती. कारभाऱ्याची अंजी भिरभिऱ्या डोळ्यांनी गावात हिंडत होती. आनंदा बारक्याबारक्या चोऱ्या करून गुजराण करीत होता. रामा बनगराचे रिकामपण तसेच कायम होते. वासाने लांडगा हेरणारा त्याचा म्हातारा अजून मेंढरांमागे जात होता.

वाडीतले तरणेबांड मेंढके सकाळी उठून मेंढरांमागे जात होते. दिवसभर रानात हिंडून संध्याकाळी घरी येत होते, मेंढरे जुळवत होते आणि रात्री सावध झोप घेत होते. धनगरणी भाकरी भाजीत होत्या, सूत कातीत होत्या आणि मुलांना पाजीत होत्या. असे सर्व चालले होते आणि एके दिवशी मी सरकारात कळविले त्याचे उत्तर आले. एप्रिलच्या वीस तारखेस हुजुरांची स्वारी वाडीस भेट देईल, असे कळविण्यात आले. आणि मग झपाट्याने चक्रे फिरू लागली. एक दिवसआड एक अधिकारी तालुक्याहून येऊ लागला, आणि पाहणी करून जाऊ लागला. तालुक्याहून वाडीला येणारा रस्ता चांगला तयार करण्यात आला. फूटवाटेपाशी पांढरे दगड ठेवून वाडीची वाट दाखविण्यात आली. म्युनिसिपालिटीचे लोक आले आणि एके दिवशी वाडीतील सगळी भटकी कुत्री त्यांनी मारून टाकली. उकिरडे हलविण्याचा हुकूम केला. घरागणीक तो अमलात आणला. शाळेच्या इमारतीची डागडुजी होऊन तिला चुना देण्यात आला. केरकचरा, घाण जिथेजिथे होती तिथेतिथे लोटून झाडून स्वच्छता झाली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

अधिकारी म्हणाले की, गावात शिरताना महाराज एखाद्या वेळी सुरुवातीला लागणाऱ्या रामोसवाड्यात जातील, एखाद्या घरात शिरून चौकशी करतील. तेव्हा रामोसवाडा साफ करण्याचा आटापिटा सुरू झाला. प्रत्येक घर सारवूनसुरवून लख्ख करण्यात आले. रामोशांनी आपली घरे लख्ख केली, तेव्हा धनगरणींनाही इसाळ आला आणि त्यांनी पण उभेकडी सारवणे घातली. अनेक दिवसांत कधी बाहेरून न लिंपलेली, न सारवलेली घरे सारवली गेली, लिंपली गेली. काही घरे ढासळली होती, त्यांचे दगड रस्त्यांवर आले होते, ते उचलून नीट रचण्यात आले. थोडे धाकाने, काही खुषीनेही, असे हे कधी न होणारे काम होऊ लागले. स्वच्छ अंघोळ करून, केस नीट विंचरून अंगभर कपडे घातलेल्या धनगराच्या पोरीसारखी वाडी दिसू लागली. आणि तालमीचे कामही जवळजवळ पुरे होत आले.

भिंती चढल्या. खांडे चढली, दांडे पडले. गवंड्यांनी आपले काम पुष्कळ संपवले. राहता राहिले सुतारांचे. ते मात्र अजून फळ्या रंधत होते, खुंट्या कातत होते, चौकटी जोडीत होते.प्रत्यक्ष पंतसरकार आपल्या गावात येणार या जाणिवेने खरोखरीच बनगरवाडीत बदल झाला. राजाच्या येण्याविषयी उदासीन असा एकही माणूस राहिला नाही. वाडीतल्या धनगरांपैकी कुणीही अजून राजा कधी बघितला नव्हता. आणि तो प्रत्यक्ष वाडीत येणार होता. ही घटना अघटित होती. त्यामुळे एक नवे चैतन्य वाडीत आले होते. आजूबाजूच्या खेड्यांना असूया वाटू लागली होती. कधी वाडीकडे ढुंकूनही न बघणारे अधिकारी, पाटील – कुलकर्णी मामलेदार – फौजदार यांना वाडीला यावे लागत होते. पण जो जो दिवस जाऊ लागले, अधिकाऱ्यांचे जास्ती हेलपाटे होऊ लागले, तो तो आमची धांदल होऊ लागली. सभेसाठी टेबल आणा, खुर्व्या आणा, हारतुरे आणा – शाळेतल्या मुलांना नीट कपडे शिवा, गावातल्या लोकांना हजामती करून यायला सांगा. राजा येण्यापोटी अनेक भानगडी आल्या, आणि त्या धावतपळत आम्ही पुऱ्या करू लागलो.

ही धावाधाव शेवटच्या मिनिटापर्यंत चालली. “पेंडाला काय दुसरे दिवशी सकाळी साडेआठ वाजता उद्घाटन समारंभ होता आणि अद्याप तालमीवर पेंड टाकला नव्हता. दुपारचे तीन वाजले होते आणि अजून इमारत वरून उघडी होती. वेळ निश्चित झाली. मी गडबडून गेलो. ऐन वेळी जर ही वरून उघडी इमारत बघितली तर महाराज काय म्हणतील ? माझी सगळी अब्रू जाईल, वाडीचे हसे होईल असे वाटून मी अगदी गडबडून गेलो आणि कारभाऱ्यांना जाऊन म्हणालो, ‘गावाची अब्रू जाणार, कारभारी. तालमीवर पेंड अजून पडला नाही आणि स्वारी तर उद्या सकाळी येणार. ‘कारभारी गडबडीने उठला, “आं ? म्हणतूस काय पोरा ? अरं, मग बोलाव – गाव जमीव, चिखूल कर. वेळ लागतोय ? ‘धावाधाव झाली. कामधाम सोडून सारी वाडी एकत्र झाली. चिखल झाला. चिखलापासून तालमीच्या धाब्यापर्यंत शे – पाऊणशे माणूस उभे राहिले आणि पेंड टाकण्याचे काम सुरू झाले . उघडेबंब धनगर चिखलाचे गोळे भराभर एकमेकांच्या हातात फेकू लागले. तालमीवर पेंड पडू लागला. शेजारच्या गावाहून बोलावून आणलेले व्हरल डफडे वाजवू लागले आणि त्या तालावर ‘ हां – हूं , घे – घे , आला रे आला-ला ‘असे ओरडत आरोळ्या ठोकत लोक काम करू लागले.

डफड्याने घाई घेतली होती, आणि दीडदोनशे हात काम करीत होते. संध्याकाळ झाली, अंधार पडला. अगोदरच व्यवस्था असल्यामुळे गॅसच्या बत्त्या पेटल्या आणि त्यात काम चालू झाले. काम करून करून लोक आंबले. थोडी ढिलाई आली की कारभारी ओरडे, आयबू आरोळ्या मारी आणि पुन्हा नेट येई. गोंधळ चालला होता. सारे गावजागत होते. तोरणे बांधली जात होती. सरकार वेशीत येताच त्यांना एकवीस बैलांच्या रथातून आणायचे होते, त्यासाठी बैल गोळा होत होते. रथ शृंगारला जात होता. बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी अगोदरच आले होते, ते उगीच दमदाटी देत होते. स्वारी उद्या येणार आणि अद्याप तुमची तयारी नाही, याबद्दल काळजी व्यक्त करीत होते. आणि पेंड टाकायचे काम बत्त्या लावून चाललेच होते. मध्यान्हरात्र टळून गेली. काम आवाक्यात येऊ लागले. आणि एकाएकी वर, कडेला उभा राहून चिखलाचे गोळे झेलणारा आयबू खाली कोसळला. दगडाच्या राशीवर कोसळला. कोसळताना’ मेलो – मेलो !’ असे भयंकर ओरडला.

मी शाळेत उद्याच्या समारंभाचा जुळवाजुळव करीत बसलो होतो. कारभारी मिरवणुकीचा रथ सजविण्याच्या मागे होता. रामा तोरणे लावीत होता. आयबू पडला तेव्हा त्या जागी आमच्यापैकी कोणीच हजर नव्हते. तो पडला आणि तत्काळ बेशुद्ध झाला. पेंड टाकायचे काम थांबले. सर्वजण आपआपली जागा सोडून आयबूभोवती गोळा झाले. “मुलाणी मेला, मुलाणी मेला ”असा ओरडा झाला- अगोदरच गोंधळ, आरडाओरडा इतका चालला होता की, आम्ही जवळपास असूनही या ओरड्याचा पत्ता कुणाला लागला नाही. आनंदा धावत कारभाऱ्यापाशी गेला आणि म्हणाला, ‘आयब्या मुलानी पडला, त्येला झेंडू फुटलाय !” तालमीपाशी कारभाऱ्याने काम थांबलेले बघितले, तेव्हा तो म्हणाला, ‘अरं, तुमी गप का ? मुलानी पडलाय, पडू द्या. तुमी कामाला लागा!”आणि त्याने लोकांना हाकून पेंड टाकायला लावले. आयबूला उचलून माझ्या खोलीत नेऊन टाकले आणि काम सुरू झाले. पहाटेचा कोंबडा ओरडला होता, उजाडायला आले होते. आता फाँ करून मोटार येणार होती.

कुणाला मरायलासुद्धा सवड नव्हती, तिथे रडायला काय असणार ? कांदा फोडून आयबूला हुंगायला दिला, माथ्यावर पाणी मारले. आयबू डोळे उघडीना, तेव्हा दार ओढून घेऊन कारभारी बाहेर आला आणि कामाला लागला . हे लग्नकार्यच होते . मेले मढे झाकून ते उरकणे आवश्यक होते ! पेंड टाकून पुरा झाला आणि टळटळीत उजाडले . अंघोळी करण्यासाठी, चिखलाने बरबटलेली अंगे धुण्यासाठी लोक विहिरी- ओढ्यावर गेले. चारसहा रामोशांना वाटेने पुढे पिटाळले. शिंगवाला उंच झाडावर बसवला. लांब मैल दोन मैलांवर मोटार दिसताच त्यांनी इशारा करावा असा संकेत ठरला. आणि बरोबर आठ – सव्वाआठच्या सुमारास खुणेचे शिंग वाजले. “आले आले, सरकार आले ‘म्हणून धावाधाव झाली. पोरे काखेला मारून धनगरणी वेशीकडे धावू लागल्या. बंदोबस्तासाठी पुढे आलेल्या शिपायांनी त्यांना दटावून परत पाठविले. रथाला बैल जुंपून आम्ही तयार राहिलो. राजा गावात येताच गावच्या पाटलाने हातात एक नारळ आणि रुपया…

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading