बनगरवाडी:
लागल्या आणि धडाधड मेंढरे मरू लागली. रोज सकाळी पाचदहा मुडदे पडू लागले. बिचारा तो पोरगा सता रोज ते मुडदे ओढून गावाबाहेर टाकू लागला. कातड्याची किमत फार उतरली. आसपासच्या गावचे व्हरल येऊन चारसहा आण्याला एक अशी कातडी खरेदी करून नेऊ लागले. मेली मेंढरे सुरुवातीसुरुवातीला महारापोरांनी नेली, पण मग त्यांनासुद्धा कीक आला. कातडी सोललेले मेंढरांचे मुडदे तसेच रानात पडू लागले. गिधाडे नाही तिथून गोळा होऊ लागली. गावातली कुत्री सुरुवातीसुरुवातीला त्या पाखरांच्या अंगावर धावली, पण पुढे पाखरे आणि कुत्री एकाच जागी मास खाऊ लागली. वाडीशेजारच्या वडावर गिधाडांनी छावणी टाकली.

अवजड अंगाची ती पाखरे दिवसभर मेढरे खाऊन संध्याकाळी त्या वडाच्या फांद्या शीट टाकून पांढरीशुभ्र करू लागली. सातआठ दिवसांच्या आत बिरा धनगराचे दोनशे मेंढरांचे खांड पार नाहीसे झाले. बिराने नशिबाला दोष दिला. देवाला नवस केले. त्याच्या जिवाची उलघाल झाली. लाडकी मेंढरे मरताना बघून सता रडूओरडू लागला, पण व्हायचे ते घडलेच. बिरा धनगराची काठी बसली. त्याचे सगळे खांड नाहीसे झाले. माणसे उपासतापास काढू लागली. शक्य होते तोवर त्यांनी विकत आणून वैरणी गुरांपुढे टाकल्या.
तोडचा घास काढून कळणाकोडा त्यांना चारला. पण मग निभेना. भुकेमुळे पेकाळून, दावणीशी गप बसलेल्या गुरांचे करुण डोळे त्यांना बघवेनात. रामोशांनी पूर्वीपासून चालू असलेला दारू गाळण्याचा धंदा जोरात सुरू केला, पण दारूला गिऱ्हाईक मिळेना. वांगीची बाई पळविणारा तो बांड जगन्या रामोशी भुकेअभावी दारूची नशा करू लागला, आणि त्याच्या अंगावरची चरबी पार झडली. अखेर काबूनकावून एकटाच तीसपस्तीस मैल जमीन तुडवून पार महूद गावी गेला. त्याच्यासारखे बरेच गुळकरी तिथे जमले होते. गावातल्या शेतकऱ्यांनी ‘भांगलणीचे काम त्यांना दिले होते. हे उपरे लोक केव्हा चालू लागतील त्याचा नेम नाही म्हणून तीन दिवसांनी काम संपताच रोजगार देण्याचा वायदा त्याने केला आणि लोक भांगलू लागले.
Bangarwadi – Venkatesh Madgulkar (Part 35)
धोतराने पोट आवळून जगन्या रामोशाने तीन दिवस भांगलले. भुकेची ग्लानी घेऊन खुरपे चालवले. आणि तिसरे दिवशी हरळीने भरलेल्या पाटातच तो कोलमडून पडला तो पुन्हा उठला नाही. पोटाने म्हातारा झालेल्या बैलाला ओढत ओढत गावाबाहेर जाताना मला शेकू भेटला. मी विचारले, “कुणीकडे शेकूबा ? ‘शेकू उभा राहिला आणि म्हणाला, ‘आता निर्भना मास्तर. बाजाराला जाऊन बैल इकून टाकतो. जिथं जाईल तिथं पोटभर चारा तरी खाईल.आपल्या दारात मेलेला काय वाईट ? “मेंढरे मोडून त्यांचे धान्य आणण्यासाठी लोक लांबलांबच्या बाजाराला जाऊ लागले. चारचार मेंढरे देऊन पायली चार पायली जोंधळे घेऊ लागले. त्या जोंधळ्यांच्या कण्या घशाखाली उतरेनात. जे सुरुवातीला गेले त्यांची मेंढरे विकली गेली, पण पुन्हा मागून जे गेले ते हात हलवीत परत आले. कुठल्याही बाजारात जनावरांना गिहाईक राहिले नाही.
घेणारा घेऊन त्याला घालणार काय ? वाळून कोळ झालेला आनंदा एके दिवशी आला आणि म्हणाला, “जातो जगायला मास्तर ! “मास्तर काय सांगणार ? “कुणीकडे जातोस?” जातो वाट होईल तिकडं . कुटं जिथं पीकपाणी असेल तिथं काम करू. जगलोवाचलो तर माघारी येऊ. “थोडा वेळ आनंदा थांबला आणि मग हलकेच म्हणाला, “मास्तर, बालट्याला मी आनि आयबूनं मिळून मारलं. तुमाला लइ तरास देऊ लागला म्हणून मारलं. “काय सांगतोस ? ”माझ्या गळ्याची आण! “पण आयबू माझ्याजवळच झोपला होता त्या रात्री. ‘मारून येऊन झोपला हुता गप ! “ही कबुली दिली आणि आनंदा गेला. कवाडे बंद करून रामोशांची सगळी माणसे गावाबाहेर पडली. ती पंधरावीस माणसे, पाठीशी बोचके घेऊन, वरचेवर मागे बघत, जीव जगविण्यासाठी गावाबाहेर पडली. त्यांच्या शेळ्या त्यांच्या मागोमाग होत्या. पोरे खांद्यावर होती. बायाबापड्या, म्हातारेकोतारे – सगळे बरोबर होते. एखाद्या फासेपारध्यांच्या लटांबराप्रमाणे हे रामोशी पाय ओढत, फुफाट्याने भरलेला रस्ता तुडवीत अन्नाच्या शोधासाठी निघून गेले. वाडीचा रामोसवाडा रिकामा झाला.
मग हळूहळू मेंढरांची खांडे पुढे घालून मेंढके गेले. त्यांची केसाळ कुत्री गेली. ज्यांच्या जिवावर धनगरांचे जीवन होते ती मेंढरे उपासाने मरू लागली, तेव्हा मने घट्ट करून तरुण मेंढक्यांनी गाव सोडले. त्यांच्या मागोमाग घरातली माणसेही गेली. दुष्काळी मुलूख ओलांडायचा आणि पलीकडे जायचे. मग ते ठिकाण कितीही दूर असो, कुठेही असो. धनगर तिथे पोचणार होते. घेता येईल तेवढे सामानसुमान पाठीवर घेऊन धनगर बाहेर पडले. बें – बें करून ओरडणाऱ्या मेढरांना हाकलीत, त्यांच्या थकलेल्या पोरांना उराशी उचलून घेत त्यांची यात्रा सुरू झाली.
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
