बनगरवाडी..
जमिनीवर ठेवलेली चिलीम, छापी, चकमक उचलून त्याने गोल अंगरख्याच्या खिशात घातली, भाला उचलला आणि छाती काढून तो बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. काही वेळ मी गप बसून राहिलो. माझ्या कपाळावर घाम आला होता. श्वास चोरटा झाला होता. पटकन उठून दार दडपावे आणि कडी घालावी, असे मनात आले. पण ही क्रिया माझ्या हातून घडली नाही. खोलीतील घोगड्यावर मी पालथा पडलो. काही वेळ गेला आणि उघड्या दारातून कुणी आत आल्यासारखे वाटले. माझ्या मानेवरचे केस उभे राहिले. भीतीची सणक मणक्यातून गेली. झटकन उठून बसलो आणि समोर बघू लागलो.

बाहेरच्या काळोखातून वीसबावीस वर्षांचा एक दांडगादुंडगा माणूस आत आला आणि मुकाट्याने उंबऱ्यालगत, भिंतीला टेकून बसला. तो माझ्या ओळखीचा नव्हता. आजपर्यंत मी गावात त्याला कधी बघितले नव्हते. घोगऱ्या आवाजात मी विचारले, ” कोण आहे ? ” ” मी – आयबू. मला काही बोध झाला नाही. पावसाने भिजणाऱ्या कुत्र्यासारखा आत येऊन बसणारा हा आयबू कोण, हे माझ्या लौकर ध्यानात आले नाही. तो मात्र गुडघे उभे करून आणि हातांची मिठी त्यांच्याभोवती घालून गप बसला होता. मग त्याने तोंड वळवून माझ्याकडे बघितले. चिमणीच्या उजेडात त्याचे बारीक डोळे, हसरा चेहरा मी बघितला. ” इथलाच का ? ” ” नाही. मी एखतपूरचा. “ एखतपूरचा ? लांब आलास इकर्ड. कुणाकडं उतरला आहेस इथं ? ” आयबूने डोक्यावर दाबून बसलेली टोपी काढली आणि खाली जमिनीवर ठेवली. दोन्ही हातांचे तळवे जोडून सर्व खोलीतून नजर फिरवली. आणि ” मला कुणी नाही. पोटामागं गावोगाव हिंडतो, आज हितं आलो. शाळपुढं लोकांनी सांगितलं, मास्तर हाय एकलाच, जा त्येचा सोबतीला. आलो! “आणि त्याची माझी ओळख अनेक दिवसांची अनेक वर्षांची आहे, असे मला वाटले.
फुगीर गालांचा आणि तांबड्या नाकाचा आयबू का हिंडत असेल, कसा जगत असेल, याचा विचार मला करावा लागला नाही. तू गाव का सोडलास, इथे नेमका कसा आलास, काय करणार आहेस, कुठे राहणार आहेस, अंगावरच्या कपड्यांशिवाय तुझ्यापाशी दुसरे काहीही कसे नाही – हे प्रश्न मला विचारावे लागले नाहीत. अंगातल्या कुडत्याच्या चिरफळ्या झालेल्या, मुसलमानी चोळणा घालणाऱ्या आयबूची न् माझी जास्त भाषा झालीच नाही. सकाळच्या न्याहारीसाठी ठेवलेली एक भाकरी मी काढली, वर थोडे तिखट आणि तेल घातले, आणि ती त्याच्या हाती दिली. बसला त्याच स्थितीत त्याने एका हातावर ती बोलबोल म्हणता संपवली. मटमट आवाज करणारे त्याचे तोंड गप झाले. तांब्या भरून दिलेले पाणी तो ओंजळ लावून प्याला. उंबऱ्याच्या खाली उतरून चूळ खळखळून आला. भिंतीला लागून त्याने तो मोकळा तांब्या पालथा घातला आणि बाहीला तोंड पुसून परत इकडेतिकडे बघत पहिल्यासारखा बसून राहिला.
आढ्याकडे बघत मीही पाचदहा मिनिटे वळकटीला टेकून पडून राहिलो. आणि आयबूचे जड श्वास ऐकू येऊ लागले. त्याच स्थितीत गुडघ्यात मान घालून तो झोपला होता. निवारा मिळाला, पाणी पिण्यापुरती भाकरी मिळाली. गडद झोप लागली. मी खालचे घोंगडे काढून त्याच्याकडे टाकले. ते अंगावर पडताच तो जागा झाला. जड झालेल्या डोळ्यांनी त्याने एकवार माझ्याकडे आणि एकवार त्या घोंगड्याकडे बघितले. मी चादर अंथरून त्यावर पडतो आहे हे ध्यानी येताच त्याने घोंगडे घेतले. अर्धा भाग खाली घेतला, अर्धा अंगावर घेतला. दूधभात खाऊन मांजर झोपते, तसा आयबू झोपला. बेताबेताने घोरू लागला. भाला वागवणाऱ्या त्या दादूला यापुढे मुळीच भीक घालायची नाही, असा निश्चय स्वत:शी केला. मुळात मी भित्रा माणूस मुळीच नव्हतो.
गेल्या एवढ्या टीचभर आयुष्यात मी अनेक भलेबुरे अनुभव घेतले होते. सामान्य मुलाच्या वाट्याला क्वचित येईल असले आयुष्य भोगले होते. पण त्या मानाने हा अनुभव वेगळा होता, म्हणून एकदम मी गांगरून गेलो. पण त्या गांगरण्याची उलटी प्रतिक्रिया म्हणूनच की काय, विलक्षण बेरडपणा माझ्यात आला. आणि वारा येण्यासाठी खोलीचे दार मोकळे सोडून, आयबूइतक्याच निष्काळजी मनाने मीही गडद झोपी गेलो!बनगरवाडीची बहुतेक वस्ती धनगरांची होती. रंगाने काळेभोर असलेले हे धनगर सदोदित उघडे वावरत. बाहेरच्या जगाविषयी त्यांना विशेष ज्ञान नव्हते. ते नव्हते याची जाणीवही नव्हती. भल्या सकाळी उठून, रात्रभर वाडग्यात कोंडलेली मेंढरे घेऊन ते वाडीबाहेर पडत. तीनएक मैलांवर गवताळ कुरण होते, तिकडे जात. शंभर शंभर मेंढरांमागे एक धनगर आणि एक कुत्रे असे. खाली मान घालून फुर्रफुर्र करीत मेंढरांचा कळप सारखा हलत राही.
नाना जातींच्या गवताचे बी त्यांच्या लोकरीला चिकटून इकडून तिकडे प्रवास करी. जागजागी पडे. पुढच्या वर्षी मेंढरांना खाण्याजोगे गवत त्यातून जन्म घेई. खांद्यावर काठी टाकून धनगर मेंढरांमागे हिंडत राही. कडक उन्हामध्ये तळत तो दिवसभर उभा असे. त्याचे कुत्रेसुद्धा कंटाळून जाई. टुणटुण उड्या मारणाऱ्या टोळाचा पाठलाग कर, काळसर रंगाच्या सरड्यामागे धाव, उगाच भुंक – असले काही काही करून त्याला आला कंटाळा घालवावा लागे. धनगराचेही तसेच होई. मग कधी एखादे तल्लख मेंढरू निवडून तो त्याच् गळ्यात डुंगरू बांधी. भाकरी खायला बसला म्हणजे भाकरीचा तुकडा त्याच्या तोंडात देई. पीक आढळले की एक – दोन कोवळी ज्वारीची कणसे खुडून ती चारी. असे वागवल्याने सवयीचे होऊन ते मेंढरू कुत्र्यासारखे त्याच्या मागून जाई. इतपत तयारी झाली की मग इतर मेंढरे माळावर चरू लागली म्हणजे करमणुकीखातर तो त्याला काठीवरून उडी मारायला शिकवी. बैस म्हणताच बसावे आणि ऊठ म्हणताच उठावे, अशी सवय त्याला लावी. कधी हाती नेहमी असलेल्या कुऱ्हाडीने बाभळीची काठी तोडून ती ताशी तर कधी फासे लावून कबूतर पकडी.
मेंढरे चरत आणि मेढके असे काही करून वेळ घालवीत. पण अशी एकूटपणाची वेळ त्याला क्वचित येत असे. कारण बहुधा तीनचार मेंढके मिळून आपली खांडे चारीत. दुपार झाली की आळीपाळीने विहिरीवरून आंघोळी करून येत. जसजशी उन्हे चढू लागत तसतशी मेंढरेही दमगीर होऊन पाण्याकडे जाऊ लागत. सुकल्या ओढ्याओघळीला असलेले हिरव्यागार शेवाळाखालचे पाणी पिऊन ती जोगावत आणि अपुऱ्या सावलीला उभी राहत. मग मेंढकेही सावली बघत आणि एकत्र बसून भाकरी खात. ती खाऊन झाली की नजर द्यायला एखादा मेंढका जागा राही. आणि दोघे घोंगड्यांचे बोळे उशाशी घेऊन पटक्यांचे शेमले तोंडावर टाकून डुलक्या घेत. त्यांची कुत्री गार ओल्या वाळूत अंग घोळसून ल्हा – ल्हा करीत बसत. दिवस थोडा उरला की मेंढके गावच्या दिशेने मेढरे वळवीत. माळावरचा चघळचोथा टिपटिपत गावाशेजारी यायला त्यांना संध्याकाळ होई. गाव जवळ आले की एक – एक मेंढका बाजूला उभा राही. आणि आपआपली मेंढरे बोलावून घेई. पुन्हा एकाची तीन खांडे होत.
नवऱ्याच्या माघारी घरी राहून रहाटावर वा टकळीवर लोकरीचे सूत काढणाऱ्या बायका मेढरे येताच लगबगीने उठत. कोंडून ठेवलेली लहान कोकरे सोडत आणि चार काटक्या खुपसून चुलीला जाळ घालत, हा वेळपर्यंत बहुधा अंधार पडलेला असे. सर्वांच्याच घरी काड्याची पेटी नसे, तेव्हा बायका लामणदिवे घेऊन शेजारणीच्या दिव्यावर पेटवून आणत आणि चुलीला पेटत घालून ऊन भाकरी टाकत. परत आलेल्या मेढक्यांना ‘ मेंढरे जुळवणे ‘हा एक अएक तासाचा कार्यक्रम असे. घरी राहिलेली लहान पोरे आणि रानातून आलेल्या मेंढ्या यांचा एकच गोंधळ होई. आई पोराला शोधत राही आणि पोर आईला बोलवत राही. बें – बें, में – मेंचा एकच गोंधळ होई. भुकेली पोरे कुठल्याही मेंढीच्या कासेत शिरून दुशा मारू बघत. आईला तो नवखा स्पर्श कळे, आणि ती उडी मारून बाजूला जायला बघे. त्या धडपडीत लहान पोरे कोलमडत, उताणी पडत.
पोरांसाठी वेड्या झालेल्या मेंढीच्या लाथा त्यांच्या तोंडांवर , डोळ्यांवर लागत. साऱ्या गावभर हा गोंधळ चालू असे. हजार – बाराशे मेंढरे आणि त्यांची चारदोनशे पोरे यांचे आवाज सारखे उठत राहत. मेंढक्याला आणि धनगरणीला साधे बोलणे ओरडून बोलावे लागे. मेंढरांच्या आवाजात हे उंच बोलणे मिसळे. वारा गुरगुरत वाहत राही. चिमण्या – कावळे गोगाट करीत, मेंढरांनी टाकलेल्या लेड्यांचा आणि मुताचा वास भपकारत राही. या मेंढरांच्या गोंधळात शिरून मेढक्याला मेंढरे जुळवावी लागत. ह्या गंगीचे हे लावार, ह्या भुरीची ही काळी पोरे – असे करून जुळवावे लागे. चुकलेली पोरे मागच्या एका तंगडीला धरून तो चालवत आईपाशी आणी आणि कासेला लावून देई. असा प्रकार अर्धा – अर्धा तास..
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन )
