बनगरवाडी.
मला चालेल का नाही याची कल्पना नव्हती. कधी प्रसंग आला नव्हता. प्रयत्न करून बघायला हरकत नाही म्हणून मी म्हणालो, ” बघतो चालला तर – द्या माझ्यापाशी. ‘रामा होकार देऊन उठून गेला. रात्री घरी आणून त्याने तो रुपया माझ्यापाशी दिला. एखादे जडजवाहीर देतात तसा दिला. तो देताना त्याचा जीव धाकधूक करत होता हे मला समजले. रुपया मास्तरने खाल्ला तर ?

शनिवारी सकाळची शाळा करून मी विभूतवाडीला गेलो. दीड दिवस घरी काढून परतशाळेला रुजू झालो. रामाच्या रुपयांची मला आठवण झाली.तो मी मोडून आणला होत. पण दोनचार दिवस रामा शाळेत आला नाही. चौकशी करता समजले की, त्याचे एक मेंढरू चुकले आहे, तो शोधण्यासाठी तो कुठे परगावी गेला आहे. यानंतर तो शाळेत आला तेव्हा मी खिशातून पैसे काढले आणि त्याला दिले. “तुमचा रुपया मोडला – ही मोड. “मी शिकवण्याच्या नादाला लागलो. मोड धोतराच्या कोपऱ्यात बांधून रामा बाहेर केव्हा गेला ते मला कळले नाही. रात्री जेवण करून मी वाचीत बसलो होतो, तेवढ्यात तो परत आला. कधी नव्हे तो माझ्या घराकडे आला. आणि भुईवर बसला. मी विचारले, “ काय रामभाऊ, मेंढरू मिळालं का ? “हां मिळालं. हितंच – शेजारच्या वस्तीवर घावलं !” मग चार दिवस बरे लागले ?
“पावण्याकडं गेलो मेटकरवाडीला. मी पुढे वाचू लागलो. रामा बसला बसला आणि म्हणाला, “मास्तर, माझ्या रुपयाची मोड कशी आणली? ” आणली एका वाण्याकडनं. ओळखीचा होता. “ते न्हाई विचारत. कशी म्हंजे कनवटीला लावून आणली, का खिशातनं आणली अंगरख्याच्या, का कशी ? ” मला प्रश्नाचा रोख कळला नाही. म्हटले, “विजारीच्या खिशातनं आणली. का ? ” “ पक्कं अगदी ? ” ” हो, का ? ” मग याद करून बघ, तुझं काही पैसं होतं का त्याच खिशात ? “उत्तर द्यायला मला थोडा वेळ लागला. ” होते; पण का ?” मग लागला हिशोब. पैसे जास्ती आलेत आमाकडं.’ आणि असे म्हणून त्याने खिशातून चंची काढली, आणि त्यातले दोन आणे काढून माझ्यापुढे ठेवले. ते दोन आणे बघताच सारा प्रकार माझ्या लक्षात आला. बुचडेवाल्या राणीचा रुपया बंद झाला होता तरी त्यात चांदी असल्यामुळे काही व्यापारी अठरा आणे देऊन तो घेत होते. त्या हिशेबानुसार रामाच्या रुपयाचेही अठरा आणे आले होते.

हा खुलासा पैसे आणल्यावेळी करायला मी विसरलो. रामाने घरी जाऊन चार – चार आण्यांचे चार ढीग घालून बघितले , पण चार ढिगांशिवाय दोन आणे वर येऊ लागले. तेव्हा साहजिकच मास्तराने चुकून जास्ती पैसे दिले अशी त्याची समजूत झाली आणि तो चौकशीसाठी परत आला. हा सगळा खुलासा त्याच्यापाशी करून मी ते दोन आणे उचलून त्याच्याकडे टाकले , तेव्हा त्यातील एक आणा माझ्याकडे फेकून तो म्हणाला, ” मग हे राहू दे तुला – पानतमाखूला. मी तो आणा घेतला नाही. रामजीने कितीही गळ घातली तरी घेतला नाही. रामाने विचारले, “रुपया चालतो म्हणायचा मग? “मी म्हणालो, “ हो, चालतो. नुसता नाही – दोन आणे फायदाही होतो ! ” “ हे आमाला ठावं कुटाय ! गावात कैक जणांपाशी रुपयं पडून हायेत. दहाबारा निघतील. मोडून आणशील का ? ” “ गावाचं गाव बघील . तुम्हांपाशी असतील तर द्या. मी आणीन.
‘क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
