दिनांक १९ जुलै,श्रीगोंदा:
दिनांक १८ जुलै २० रोजी महादजी शिंदे विद्यालयमार्फत ऑनलाइन गूगल मीट वेबिनारचे आयोजन करण्यात आले. डायट कॉलेज, संगमनेर येथील प्रा रूपाली नाईक यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तसेच येणाऱ्या काळामध्ये कोरोनासारख्या नवीन आपत्ती निर्माण होणार आहे. अशा आव्हानांना आपल्याला सामोरे जाण्याची तयारी नेहमी असली पाहिजे. जीवनामध्ये फक्त नोकरीमागे धावण्यापेक्षा इतर क्षेत्रांचा अफाट पसारा आपण शोधला पाहिजे. त्यातून आपले करिअर करण्यासाठी क्षेत्राची आपला कल व क्षमतेनुसार डोळसपणे निवड केली पाहिजे. येणाऱ्या काळात रोबोटिक्स सायन्स, मानवी आरोग्य सारख्या क्षेत्रांमध्ये मोठी संधी आहे. संशोधन क्षेत्रामध्ये सहभागी होऊन आपल्या करिअर करता येऊ शकते.
अशा कला, वाणिज्य, इंजीनियरिंग, शेती, आरोग्य, व्यापार अशा प्रकारे विविध प्रकारच्या सात क्षेत्राची व त्यामधील संधींची माहिती विस्तृतपणे प्रा. नाईक यांनी सांगितली.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन याप्रसंगी मार्गदर्शिका प्रा. नाईक यांनी केले. इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेबनारला ऑनलाइन उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर, उपप्राचार्य बाळासाहेब जाधव पर्यवेक्षक उत्तम बुधवंत, ऑनलाइन उपस्थित होते. वेबिनारचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक दत्तात्रय मोरे यांनी केले. नियोजन व सूत्रसंचालन सचिन झगडे सर यांनी केले.
(स्रोत: सचिन झगडे सर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
