भिगवण अपहरण प्रकरण: तरूणीचा धक्कादायक खुलासा; श्रीगोंदा मार्गे महाबळेश्वर गाठले.! आईसोबत जाण्यास नकार…

दिनांक २० फेब्रुवारी २०२६, श्रीगोंदा/भिगवण:

पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात आता एक मोठे वळण आले आहे. ज्या तरूणीचे अपहरण झाल्याचा दावा आई आणि भावाने केला होता, तिने मध्यरात्री स्वतःहून बारामती पोलीस ठाण्यात हजर होऊन आईचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

मुलीच्या आईने डोळ्यात मिरची पूड टाकून अपहरण केल्याचा आरोप केला होता. मात्र, तरूणीने कोर्टासमोर स्पष्ट केले की, ती स्वतःच्या मर्जीने मुलासोबत गेली होती आणि मिरची पूड टाकल्याचा कोणताही प्रकार घडला नाही.

तरूणी आणि तरुण भिगवणवरून निघाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे आणि सासवडमार्गे थेट महाबळेश्वरला पोहोचले होते.

आज न्यायालयात आई आणि मुलीची भेट घडवून आणण्यात आली, मात्र तरूणीने आपल्या कुटुंबासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप गिल यांनी माहिती दिली की, जरी आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल असला तरी, मुलीच्या जबाबामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तरुणाला सध्या अज्ञात स्थळी ठेवण्यात आले आहे.

“मुलीने दिलेल्या जबाबानुसार ती स्वमर्जीने गेली होती. आई आणि मुलीच्या विधानात मोठी तफावत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.” – संदीप गिल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply