दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ शिरूर/श्रीगोंदा:
शिरूर तालुक्यातील घोड धरण परिसरात गेल्या दोन वर्षांपासून रात्रीच्या अंधारात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे. शिरूर पोलीस आणि शिरूर तसेच श्रीगोंदा महसूल विभागाने आतापर्यंत पाच वेळा बोटी उडवून कारवाई केली असली, तरी वाळू माफियांचा मुजोरपणा तसूभरही कमी झालेला नाही. यामुळे प्रशासकीय कारवाई केवळ कागदावरच आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
चिंचणी, गुनाट आणि निमोणे या गावांच्या शिवारात सूर्यास्तानंतर यांत्रिक बोटींचा आवाज घुमू लागतो. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठी वर्दळ असते.
शिरूर व श्रीगोंदा महसूल विभागाने जिलेटिनच्या साह्याने बोटी उडवूनही काही दिवसांतच उपसा पुन्हा सुरू होतो. यामुळे वाळू माफियांना नेमके बळ कोणाचे? अशी चर्चा सुरू आहे.
अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळी घटली असून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही ठराविक लोकांच्या फायद्यासाठी प्रशासन पर्यावरणाचा बळी देत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
केवळ बोटी नष्ट न करता वाळू माफियांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
“घोड धरणातील पाच वेळा कारवाई होऊनही जर उपसा सुरूच असेल, तर हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकपणावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता जिल्हा प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

