दिनांक १९ डिसेंबर(म्हसे,श्रीगोंदा):
नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार पवार यांनी आज सकाळी म्हसे गावात केलेल्या वाळूतस्करी वरील कारवाईच्या आवाजाने आता संपूर्ण तालुक्यातील वाळू माफिया हादरले असल्याचे समजते आहे.

कारवाई बाबत सविस्तर माहिती अशी की, तहसीलदारांच्या भरारी पथकाने म्हसे शिवारातील घोड नदी पात्रात आज पहाटे छापा टाकून वाळू चोरी करणाऱ्या ४० लाख किंमतीच्या चार बोटी झिलेटीनचा स्फोट करीत उध्वस्त केल्या आहेत. तसेच, दहा लाखाचा ट्रक जप्त करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी भोसलेंच्या आदेशानुसार स्थानिक महसुल प्रशासनाने वाळू तस्करांवर ही कारवाई केली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी वाळूची तस्करी चालू होती.याविषयी गुप्त माहीती मिळताच तहसीलदार प्रदिप पवार यांनी शनिवारी पहाटे चार वाजता मंडलाधिकारी प्रशांत कांबळे, भरत चौधरी आणि कामगार तलाठी पोटे तसेच पवन मोरे यांच्या समवेत चार बोटी व एक ट्रक म्हसे येथील माळवाडी शिवारात नदी पात्रात पकडले व बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
या कारवाई नंतर तालुक्यातील गौण खनिज चोरणाऱ्या चोरट्यांना तहसीलदार पवार यांच्या कारवाई विषयी माहिती मिळाली असून,तहसीलदारांनी आज सकाळ सकाळी म्हसे गावात केलेल्या स्फोटाचा आवाज मात्र संपूर्ण तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांपर्यंत पोहचला आहे.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)
