दिनांक १२ जून,श्रीगोंदा:
दलित आदिवासी भटके-विमुक्त सह मागासवर्गीय प्रवर्गातील बौद्ध बांधवांवरील अन्याय अत्याचारांच्या घटना राज्यामध्ये दिवसेंदिवस तोंड काढू लागल्या आहेत. नागपूर येथील तरुण अरविंद बनसोड तर पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप हे नव्याने अत्याचारग्रस्त म्हणून, समोर आलेली दोन जातीयवादी कृत्यांची उदाहरणे आहेत.
या दोन्ही घटनांचा श्रीगोंदा तालुक्यातील बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासंदर्भात श्रीगोंद्याचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे. राज्यात दलित अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. नमूद प्रकरनांचे गांभीर्य लक्षात घेत, जातिवाद्यांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने, श्रीगोंदा विधानसभा बसपा पदाधिकाऱ्यांनी घटनेच्या निषेधार्थ कारवाईची मागणी केलेले निवेदन स्थानिक प्रशासनास दिले आहे.
मौजे पिंप्री चिंचवड मध्ये पिंपळे सौदागर येथील बौध्द तरुणाची जातीवादी भावनेतुन अतिशय अमानुष पणे मारहाण करुन, हत्या करण्यात आली. विराज भालचंद्र जगताप वय – २० वर्षे या बौध्द तरुणाला सवर्ण समाजातील मुलीवर प्रेम करतो म्हणुन, लोखंडी रॉड, कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर बौध्द तरुणाची हत्या करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी बहुजन समाज पार्टी श्रीगोदा विधानसभा पदाधिकाऱ्यांनी निवेदना व्दारे केली आहे. अरविंद बनसोड या तरुण युवकासही स्थानिक राजकारण्यांच्या बगल बच्चाने राजकारणाचा गैरवापर करीत, आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे माध्यमांतून समजले आहे.
वाढत्या मागासवर्गीय अत्याचारांच्या घटना लक्षात घेता, हत्या करणारे व मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या,नराधमांवर कायदेशीर कारवाई करावी. असे बहुजन समाज पार्टीचे श्रीगोंदा विधानसभा महासचिव त्रिंबक साळवे, मढेवडगावचे शाखाध्यक्ष अजय साळवे, अक्षय ससाने, प्रथमेश ससाने, विक्की ससाने सह जिल्हा पदाधिकारी सुनील ओहोळ यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. दलित अत्याचारांच्या घटनांत बसपा आंदोलनाच्या पवित्र्यात उतरणार असल्याचे ओहोळ यांनी माध्यमांना सांगितले आहे. अश्या घटनांच्या निषेधार्थ जिल्हाव्यापी आंदोलन करीत, निषेध नोंदवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
