दिनांक ९ फेब्रुवारी १०२६,श्रीगोंदा:
अहिल्यानगर जिल्हा पूर्णतः दारूमुक्त करावा आणि श्रीगोंदा तालुक्यातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत, या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे (बसपा) जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली आज, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे तालुक्यातील अवैध व्यवसायांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तालुक्यातील अवैध धंदे हे पोलीस निरीक्षक (PI) किरण शिंदे यांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा थेट दावा आंदोलकांनी केला आहे.

तरुणाई बरबाद होत असल्याचा संताप व्यक्त करत आंदोलनाचे नेतृत्व करताना सुनील ओहोळ यांनी समाजातील वास्तव मांडले. ते म्हणाले की, “दारूच्या वाढत्या प्रसारामुळे केवळ तरुण पिढीच नाही, तर अल्पवयीन शालेय मुलेही व्यसनाधीन होत आहेत. अनेक हसती-खेळती कुटुंबे दारूमुळे उद्ध्वस्त झाली आहेत.
आंदोलन सुरू असताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी सुनील ओहोळ यांनी आक्रमक भूमिका मांडत काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
ज्या आरोपींवर दारूबंदी संदर्भात तीन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, त्यांना तातडीने तडीपार करण्यात यावे. तालुक्यातील सर्व अवैध दारूभट्ट्या आणि विक्री केंद्रे मुळासकट उपटून टाकावीत.

नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांनी पोलीस प्रशासनाला यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.
मात्र, “जर प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर यापुढे अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा सुनील ओहोळ यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला आणि दारूमुळे बाधित झालेली पीडित कुटुंबे उपस्थित होती.
प्रशासनाने याकडे सकारात्मकतेने पाहून कारवाई केल्यास जिल्हा दारूमुक्त होण्यास मोठी मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सुनील ओहोळ यांच्यासह विठ्ठल म्हस्के, मुकुंद सोनटक्के, दिपक घोडके, Ad. प्रदिप खामगळ, वसंत सकट, साहेबराव रासकर, त्रिंबक साळवे, नितीन जावळे, रोहित साळवे, कचरू लष्करे, राम ससाणे, भिमराव घोडके, संजय रणशिंग, अंबादास घोडके, चांगदेव शिंदे, सतिश कुसाळकर व बहुजन समाज पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(आंदोलन)
