दिनांक ८ मार्च २०२६,श्रीगोंदा:
तालुक्यातील जोशी वस्ती परिसरात शनिवारी रात्री अवैध गोवंश वाहतूक करणारी पिकअप गाडी तरुणांच्या एका जमावाने पकडली. या कारवाईत तीन देशी गाईंची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मात्र, पकडलेल्या संशयितांना जमावाने मारहाण केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री एका पिकअप वाहनातून तीन देशी जातीच्या गाईंची ने-आण केली जात होती. जोशी वस्ती परिसरात काही तरुणांना या वाहनाचा संशय आला. त्यांनी वाहन अडवून पाहणी केली असता, त्यात गाई आढळून आल्या.

यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमला. संतप्त जमावाने गाईंची वाहतूक करणाऱ्या तीन युवकांना ताब्यात घेतले आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून अवैध गोवंश तस्करी केल्याप्रकरणी शेख व मोरे (दोन्ही रा. खडकत) आणि पुराणे (रा. श्रीगोंदा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या गाईंची रवानगी सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे.

या घटनेनंतर तालुक्यात दोन प्रकारचे सूर उमटत आहेत. एकीकडे गोवंश हत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी अशी मागणी होत असताना, दुसरीकडे काही सामाजिक पदाधिकाऱ्यांनी जमावाच्या कृत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ही जनावरे नेमकी कोठून आणली? ती विकणारे आणि विकत घेणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

“तस्करी रोखणे कौतुकास्पद असले तरी, अशा प्रकारे जमावाने कायदा हातात घेऊन मारहाण करणे कितपत योग्य आहे?” असा सवाल सामाजिक कार्यकर्ते bs सावंत उपस्थित केला आहे.

पोलीस आता या प्रकरणातील मुख्य साखळीचा तपास करत असून, अवैध वाहतुकीसाठी वापरलेले वाहन आणि त्यामागील कारणांचा शोध घेत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
