दिनांक १२ एप्रिल (मांडवगण,श्रीगोंदा):
तालुक्यातील मांडवगण गोसावीवाडी गोरे मळा येथील आंब्याच्या झाडाखाली ११ जणांनी विनापरवाना एकत्र येत चिकन बिर्याणी बनवण्याचा बेत आखला होता. मात्र,पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊन मध्ये चिकन बिर्याणीची मेजवानी ११ जणांना भोवली आहे. बिर्याणीवर ताव मारण्याअगोदर या तरुणांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेऊन, त्यांच्या – वर कारवाई केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रघुनाथ साठे यांनी फिर्याद नोंदविली आहे. मांडवगण येथील गोसावीवाडी येथील काही तरुण एकत्र जमून, चिकन बिर्याणीची पार्टी करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली. त्यानुसार दिनांक १० एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पोलीस पथकाने छापा टाकला.
त्यावेळी विशाल वाल्मीक कुसेकर,वैभव प्रकाश मनवरे, गौरव नवनाथ मनवरे, राहुल बापू पवार, रवींद्र वाल्मीक कुसेकर,भाऊसाहेब गोरख पवार, अतुल श्रावण चौगुले, ऋतिक विठ्ठल जाधव, चेतन राजू मनवरे, सुरज अशोक मनवरे, भास्कर मारुती कुसेकर (सर्व रा.गोसावीवाडी, मांडवगण, ता.श्रीगोंदा) हे बिर्याणीची मेजवानी करताना आढळून आले.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरील अकरा जणांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
(वृत्तांकन:नितीन रोही)
