स्वगणनेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – सभापती प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर, दि. ५ – देशाच्या १६व्या राष्ट्रीय जनगणनेला डिजिटल स्वरूपात प्रारंभ झाला असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे. प्रत्येक नागरिकाने स्वगणना प्रक्रियेत सहभागी होऊन देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी चौंडी येथे स्वगणना करून जनगणना प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी टॅबच्या माध्यमातून स्वतःच्या घरगणनेशी संबंधित सर्व माहिती भरल्यानंतर त्यांचा ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी’ तयार झाला. या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेत त्यांनी नागरिकांना स्वगणना करण्याचे आवाहन केले व ही पद्धत सोपी, सुरक्षित व वेळ वाचवणारी आहे. दि. १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वगणनेची सुविधा उपलब्ध असून, त्यानंतर दि. १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणकांकडून घरोघरी जाऊन जनगणना करण्यात येणार आहे.

जनगणनेच्या या उपक्रमामुळे अचूक व अद्ययावत माहिती संकलित होऊन शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. डिजिटल जनगणनेमुळे प्रक्रिया सुलभ, जलद व पारदर्शक होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“जाणकार नागरिक – सक्षम राष्ट्र” ही भावना जपत प्रत्येकाने या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग व्हावे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वगणना ही महत्त्वाची पायरी असून, सर्वांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रा. राम शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading