श्रीगोंदा | ५ मे २०२६:
अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीगोंदा शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका वेसीच्या परिसरातील ऐतिहासिक ‘महार चावडी’ येथील पुरातन आणि अत्यंत मौल्यवान तलवारी, भाले, ढाली आणि मशाली यांची तस्करी झाल्याची तक्रार भारतीय पुरातत्त्व विभाग (ASI), पुणे विभागाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात एका बड्या राजकीय व्यक्तीने या शस्त्रांची विल्हेवाट लावल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या पत्रातील माहितीनुसार, या वेस शेजारी असलेल्या जुन्या महार चावडीच्या वास्तूमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या शस्त्रांचा मोठा साठा होता. ही शस्त्रे केवळ धातूचे तुकडे नसून, या भागाच्या पराक्रमी इतिहासाच्या साक्षीदार होत्या. मात्र, एका स्थानिक राजकीय नेत्याने स्वतःच्या पदाचा आणि प्रभावाचा वापर करून ही सर्व मौल्यवान शस्त्रे परस्पर विकल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीत केवळ शस्त्रांच्या चोरीचाच उल्लेख नसून, ऐतिहासिक वास्तू नष्ट करण्याचा कट रचल्याचाही आरोप आहे. जागा बळकवण्याच्या उद्देशाने संबंधित इसमाने जुनी महार चावडी पाडली असून, त्याखाली असलेल्या ‘बळदामध्ये’ सापडलेली शस्त्रे गायब केली आहेत.

ऐतिहासिक बुरुजाचा काही भाग जाणूनबुजून पाडण्यात आला असून, त्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राजकीय कारकिर्दीचा वापर करून या ऐतिहासिक जागेच्या विक्रीसाठी अनेकांकडून मोठी ‘इसार रक्कम घेतल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित तक्रारदाराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर भारतीय पुरातत्त्व विभाग आणि ‘निर्भीड कलम’कडे दाद मागितली आहे.

गायब करण्यात आलेल्या ऐतिहासिक तलवारी, ढाली आणि भाले यांचा तातडीने शोध घेऊन ते पुन्हा सरकारी ताब्यात घेण्यात यावेत.
या बेकायदेशीर कृत्यात संबंधित राजकीय व्यक्तीला मदत करणाऱ्या काही वकील आणि इतर राजकीय लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. शिल्लक राहिलेली ऐतिहासिक वास्तू पुरातत्त्व विभागाने ताब्यात घेऊन तिचे संवर्धन करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे श्रीगोंद्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, हा ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी आता प्रशासन काय भूमिका घेणा.? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.!
स्रोत:(तक्रारी पत्र)
AI चा वापर करून फोटो तयार करण्यात आला आहे.
